मुळानगरला 400 अश्वशक्तीचे पंप
अहमदनगर । प्रतिनिधी । 04 - नगर शहरासाठी सुरू असलेल्या फेज टू पाणी योजनेंतर्गत मुळानगर येथे 400 अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. पंपासाठी लागणार्या विजेकरीता नवीन रोहित्रे बसविण्यात आली असून आठवडाभरात त्यावरून वीज जोड घेतला जाईल. त्यानंतर हे पंप कार्यान्वीत होऊन शहराला वाढीव पाणी मिळेल, अशी माहिती महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली.
अहमदनगर शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे काम सुरू आहे. योजनेंतर्गत मुळानगर येथे पंप हाऊस व 400 अश्वशक्तीचे पंप बसविण्यात येणार आहे. जुने 200 अश्वशक्तीचे दोन पंप काढून त्याजागी बुधवारी नवीन 400 अश्वशक्तीचे पंप बसविण्यात आले. महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, उपायुक्त अजय चारठाणकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधीसोबत मुळानगर येथे नव्याने बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी केली.
यावेळी कळमकर म्हणाले, फेज टू पाणी योजनेचे मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत प्रशासनाच्या अनेकदा बैठका घेऊन नियोजन केले. मुळानगर, विळद, नागापूर व वसंत टेकडी येथे वीज उपकेंद्र उभारून पंप, मोटार, रोहित्रे बसविणे, टाक्यांची कामे पूर्ण करणे, टाक्या मुख्य जलवाहिनीला जोडणे ही कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. त्या नियोजनानुसार टाक्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. तसेच त्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यात आल्या असून उध्र्ववाहिन्यांचे काम सुरू आहे. मुळानगर, विळद नागापूर येथे वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून रोहित्रे उभारणीचे कामही झाले आहे. आता मुळानगर येथे जुने पंप काढून तेथेही नवीन पंप बसविण्यात आले आहेत. या नवीन पंपासाठी लागणारा वीज पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून वीज वितरण कंपनीकडे आमदार संग्राम जगताप हे पाठपुरावा करत आहेत. येत्या आठवडाभरात पंपाचा वीज पुरवठा सुरू होईल. त्यानंतर हे पंप कार्यान्वीत होईल. हे पंप सुरू होताच शहर पाणी पुरवठयात वाढ होणार आहे. त्यानंतर आणखी नव्याने 400 अश्वशक्तीचे दोन
वीज पंप बसविण्यात येणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.