Breaking News

शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल तर काँग्रेसचे अभिनंदन

मुंबई, प्रतिनिधी, दि. 4-  हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र यांनी धर्मशाला येथे भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मनापासून स्वागत करीत अभिनंदन केले आहे. मात्र, धर्मशालेतील रद्द होणार्‍या पाक सामन्याचे आयोजन महाराष्ट्रात करू व चोख बंदोबस्त देऊ अशी आरोळी जालन्यातून किंवा नागपुरातून उठू नये म्हणजे झाले असे सांगत भाजपवर हल्लाबोल केला आहे. 
हिमाचलमधील कॅप्टन विक्रम बत्रा, सौरभ कालिया जसे शहीद झाले तसे महाराष्ट्रातून कर्नल संतोष महाडिक, शंकर शिंदे, सहदेव मोरेसह असंख्य वीर पाकड्यांशी लढताना शहीद झाले आहेत. त्यामुळे हिमाचलात वीरभद्र पण महाराष्ट्रात अभद्र काही घडू नये असा चिमटा भाजपला काढला आहे. शिवसेनेने काँग्रेसचे मनापासून स्वागत करीत जाहीर अभिनंदन केले आहे. अग्रलेखात वीरभद्र यांचे कौतूक करताना म्हटले आहे की, हिमाचल सरकारने पाकड्यांच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवू शकत नाही असे सांगितले आहे. मॅचच्या दरम्यान काही बरे-वाईट घडले तर त्यास राज्य सरकार जबाबदार नाही. त्यामुळे पाकड्यांचा क्रिकेट सामना आमच्या राज्यात होणे कठीण आहे. हे झाले कायदा व सुव्यवस्थेबाबत. पण हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे जे मनोगत व्यक्त केले ते पहा, जेथे हा पाकड्यांबरोबरचा क्रिकेट सामना होणार आहे त्या धर्मशाला भागात मोठ्या संख्येने सैनिक व त्यांची कुटुंबे राहतात. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बात्रा व सौरभ कालियासारखे युद्धभूमीवरचे भारतीय हीरो याच भागातले आहेत. 
अशा वेळी पाकड्यांसाठी येथे स्वागताचे गालिचे अंथरणे हा त्या सैनिकांचा व शहिदांचा अपमान ठरेल. आम्ही शहिदांचा सन्मान करतो. त्यामुळे पाकड्यांचे स्वागत करण्याचे पाप हातून कसे घडावे? असा भावनिक विचार मांडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षासमोर धर्मसंकटच उभे केले. भाजपचे धुरंधर नेते व हिमाचलचे माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांनीही सैनिकांच्या भावनांचा आदर करा व पाकबरोबरचा क्रिकेट सामना होऊ देऊ नका असे बजावले आहे. धर्मशालेस पाकड्यांचें पाय लागू नयेत व ही पवित्र भूमी नापाक होऊ नये अशीच एकंदरीत भावना आहे, असे भाजपला बजावले आहे.
पाकिस्तानच्या बाबतीत इतके भयंकर घडूनही आपण त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात का पडत आहोत? हा प्रश्‍न विचारून  पुढे म्हटले आहे की, पठाणकोटच्या जखमा व आपले सांडलेले रक्त ताजे आहे. कश्मीर खोर्‍यात पाकड्यांमुळे आमच्या सैनिकांचे बलिदान सुरूच आहे. त्या बलिदानाला पायदळी तुडवून कुणास पाकड्यांच्या क्रिकेट प्रेमास गोंजारत बसायचे असेल तर त्यांनी देशभक्तीवर प्रवचने झोडण्याची गरज नाही. तुमची देशभक्तीची भेसळ तुमच्याकडेच ठेवा व देशाला सैनिकांच्या हवाली करा. जे राज्यकर्ते व जे जुगारी क्रिकेटवाले पाकिस्तानबरोबरचा एखादा क्रिकेट सामना, पाकड्या कलाकारांच्या मैफली लाथाडू शकत नाहीत त्यांच्याकडून देशवासीयांनी काय अपेक्षा करावी? असे सांगत भाजपवर हल्लाबोल केला आहे.