वाहनांच्या तोडफोडीची नाशिक पाठोपाठ नगरमध्येही घटना
। पाईपलाईन रोडवरील कांदबरी नगरीतील घटना । अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल । आरोपींचा शोध लागेना
अहमदनगर (प्रतिनिधी)। 14 - एक वर्षापुर्वी नाशिक शहरातील फ्लॅटच्या पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांना पेटवून देऊन दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यानंतर सहा ते आठ महिन्यापुर्वी डिएसपी चौकातील शासकीय वसाहतीमधील दुचाकी वाहने पेटविण्याची घटना घडली होती. या घटनेतील ही आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. तोच पाईपलाईन रोडलगत असलेल्या कांदबरी नगरी परिसरातील चार ते पाच वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हे दाखल केले असले तरी दोन दिवसानंतरही पोलिसांना या घटनेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उपनगरातील वाहन धारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.शहरातील पाइपलाइन रोड परिसरातील कांदबरी नगरी येथे घरासमोर पार्क केलेल्या चार कारसह एका हातगाडीची समाजकंटकांनी तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कारमालकांनी दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री कांदबरी नगरी अभिजित धोंडिराम अनाप यांची वॅगनर, डॉ. अनंत अशोक इंगळे यांची इंडिका, तेजस आकाश जिपलाटे यांची इंडिका, तर गोकुळ ताराचंद डाके यांची होंडासिटी कारच्या काचा फोडण्यात आल्या. सर्व कारच्या पाठीमागील व बाजूच्या काचा तोडण्यात आल्या आहेत. तसेच उभा असलेल्या हातगाडीची, रस्त्यावरील दुकानांसमोर लावण्यात आलेल्या पाट्यांची या वेळी तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सर्व कारमालक व हातगाडीचे मालक कैलास कोंड्याल यांनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून, पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
ही वाहने कुणी व कोणत्या उद्देशाने फोडली, हे पोलिसांना समजू शकलेले नाही. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र, अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.
तोफखाना पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीची गस्त फक्त नावापुरतीच करत असल्याचे अनेक उदाहरणावरुन दिसून आले. रात्रीच्या वेळी दोन पोलिस दुचाकी वाहनांवर गस्त घालतात. एखाद्या तक्रारदाराने फोनवरुन चोरीच्या घटनेची माहिती दिली तर ठाणे अंमलदार संबंधीत सेक्टरच्या कर्मचार्यांना फोन करतात, संबंधीत कर्मचारी घटनास्थळी येऊन तक्रारदारालाच नको ते प्रश्न विचारतात, व नेहमीप्रमाणे पोलिस ठाण्यात निघून जातात. संबंधी सेक्टरच्या कर्मचार्यांना उपनगरातील कोणत्याही रस्त्याची पुर्णपणे माहिती नाही, तसेच त्यांना कोणतेही शास्त्रशुध्द ज्ञान अवगत नाही. अशा कर्मचार्यांवर उपनगराची सुरक्षितता सोपविली जाते. घर फोडीच्या घटनेनंतर सदर कर्मचारी कोणताही तपास करत नाही अथवा तक्रारदाराने दिलेल्या कोणत्याही माहिती शहनिशा करत नाहीत, चोरट्यांची माहिती देऊनही पोलिस त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. असे प्रकार अनेकवेळा घडलेले आहेत. या घटनांमुळे चोरटे मोकाट सुटले आहेत. पोलिसांच्या वेळ काढू पणाचा फायदा गुन्हेगारही घेत आहेत. सध्या उपनगरात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे. लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सोरट खेळविला जात आहे. सोरट चालक व पोलिसांचे अर्थपुर्ण संबंध असल्यामुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. सोरटमध्ये मोठी कर्जबाजारी झाल्यामुळे याच धंद्यातील खेळणारे मंगळसुत्र पळविणे, दुचाकी चोरणे, छोट्या-मोठ्या चोर्या करणे, परिसरात दहशत निर्माण करणे, अशा प्रकार वाढले आहेत.
भिस्तबाग चौक ते तपोवन रोड तसेच एकवीरा चौक ते तपोवन रोड या परिसरात अवैध धंद्दे चालकांची चंगळ आहे. खुद्द पोलिसच दारुवाले, मटक्यावाले, सोरटवाले यांच्याशी बैठक करतात. त्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. यातूनच अशा घटनांना पुष्ठी मिळते.
पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी तोफखान्यातील हद्दीत असलेल्या उपनगरातील अवैध धंद्याची माहिती व हप्ते घेणार्या पोलिसांची माहिती काढली तर निश्चितच परिसरातील दहशतीला आळा बसेल, व मंगळसुत्र चोरीच्या घटनांना पायबंद बसेल.
