Breaking News

राजस्थानमधून गाजराची आवक सुरू

पुणे, दि. 06, नोव्हेंबर - राजस्थान येथून मार्केट यार्डात गाजराची आवक सुरू झाली आहे. येथील बाजारात मध्यप्रदेश येथील इंदौर आणि राजस्थान येथील जोधपूर येथून गाजराची आवक होत असते. इंदौर येथील गाजरांची आवक थांबली असून, आता राजस्थान येथून आवक सुरू झाली आहे. ही आवक एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या गाजरांचा दर्जा चांगला असून, गोडीही आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीही चांगली असल्याची माहिती व्यापारी आखाडे यांनी रविवारी दिली. 
गावरान गाजराचा हंगाम 15 एप्रिल ते 31 मे या कालवधीत असतो. तर 1 जुन ते 10 सप्टेंबर या कालावधीत इंदौर येथून आवक होते. तर नोव्हेंबर ते एप्रिल या काळात बाजारात राजस्थानच्या गाजराची आवक होत असते. त्यामुळे वर्षभर बाजारात गाजरांची उपलब्धी असते. रविवारी घाऊक बाजारात राजस्थान येथून 10 टन मालाची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोला 350 ते 650 रुपये भाव मिळाला. गावरान गाजरांची चव थोडीशी तुरट असते, तर राजस्तानच्या गाजरांची चव गोड आहे. त्यामुळे या गाजरांनी मागणीही अधिक असल्याने आखाडे यांनी नमूद केले.
सद्यस्थितीत चायनीज, हॉटेल, खानावळी, व्यापारी, घरगुती ग्राहक तसेच केटरींग चालकांकडून राजस्थानच्या गाजरांना मागणी आहे. विशेषत: हलवा बनविण्यासाठी या गाजरांचा वापर केला जातो. त्यामुळे घरगुती ग्राहकांकडून या मालाला अधिक मागणी असते. तसेच किरकोळ विक्रेत्यांकडूनही राजस्थानच्या गाजरांना मागणी वाढली आहे. राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यात गाजरांचे पीक घेतले जाते. विशेष म्हणजे रेतीच्या शेतीत हे पीक घेतले जाते. येत्या आठवडाभरात आवक आणखी वाढणार असल्याचेही आखाडे यांनी सांगितले.