Breaking News

तहसीलदार भारती सागरे यांचे लेखी आश्‍वासन, अखेर निलेश लंके यांचेसह कार्यकर्त्यांचे उपोषण मागे


सुपा / प्रतिनिधी 
संजय गांधी निराधार योजनेच्या गोरेगाव व हिवरे कोर्डा येथील 210 लाभार्थीची प्रकरणे मंजुर असुनदेखील, दोन महीन्यापासुन या लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली नाही. म्हणून शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निलेश लंके व त्या गावातील लाभार्थींसह हजारो कार्यकर्ते गुरूवारपासून पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
शनिवार (दि.14) उपोषणाचा तिसरा दिवस होता. निलेश लंके यांच्यासह गोरेगावचे संभाजी नरसाळे, अभयसिंग नांगरे यांचीही प्रकृती खालवली होती. यामुळे प्रशासनाकडून पुन्हा तातडीने हलचाली झाल्या. लंके यांनी सर्व कार्यकर्त्यांना संध्याकाळी तहसील कार्यालयात बोलवून घेतले. चर्चा करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. हिवरेबाबत तीन दिवसात तर गोरेगावबाबत ग्रामसभा होवून निर्णय होईल, असे लेखी तहसीलदार यांनी दिले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर सागरे यांनी हे आश्‍वासन दिले.
पहिल्या दिवशी गोरेगावच्या प्रकरणावरून चर्चा फिस्कटल्याने शुक्रवारी दुसर्‍या दिवशी उपोषणासह आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले होते. रस्ता रोको आंदोलनही झाले. दुसर्‍या दिवशी प्रांतधिकारी गोविंद दाणेज चर्चेसाठी आले. मात्र तोडगा निघण्याऐवजी लंके व दाणेज यांच्यात कार्यवाहीवरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे लंके यांचे समर्थक संतप्त झाल्याने वातावरण काही काळ संवेदनशील बनले. त्यामुळे दुसर्‍या दिवशीही उपोषण सुटले नव्हते. प्रांत व तहसीलदार आ. विजय औटी यांचे तट्टू आहेत, अशी टीका लंके यांनी केली होती.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने लंके यांचे आंदोलन बोगस लाभार्थींसाठी असल्याची टीका केली, मात्र काही तासातच त्यांनी लंके यांची भूमिका रास्त असल्याचे सांगत त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिल्याने हा चर्चेचा विषय झाला.
शनिवारी तिसर्‍या दिवशी उपोषण कोणते वळण घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. उपोषण शांततेच्या मार्गाने सुरु असून, कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका निलेश लंके प्रतिष्ठानने जाहीर केली होती. निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.
या आंदोलनात निलेश लंके यांच्यासह शेतकरी नेते अनिल देठे, शिवबा संघटनेचे अनिल शेटे, उद्योजक विजय औटी, प्रितेश पानंमद, संतोष आढाव, अभयसिंह नांगरे, वाघुंड्याचे सरपंच संदिप मगर, भोयरे गांगर्डाचे उपसरपंच दौलत गांगड, गणेश नरसाळे, संदेश कापसे, दिलीप नरसाळे, श्रीकांत चौरे, दादा शिंदे, पोटघन मेजर, सचिन पठारे, अनिल गंधाक्ते यांच्यासह तालुक्यातील शेकडो नागरिक, कार्यकर्ते व लाभार्थीं सहभागी झाले होते.