ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना टँकरने चिरडले, 1 ठार, 5 जखमी
बीड, दि. 06, नोव्हेंबर - सोलापूर-पुणे महामार्गावरील सपाटणे पाटीजवळ भरधाव टँकरने उसाच्या बैलगाडीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऊसतोड मजुरासह तीन बैल जागीच ठार झाले आहेत. सदरचा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता झाला. बैलगाडीतील अन्य ऊसतोड कामगारांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मरण पावलेला ऊसतोड कामगार हा आष्टी तालुक्यातील गोखेल येथील रहिवाशी आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यातून गेल्या महिनाभरात लाखो ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगारांचाही समावेश आहे. गोखेल परिसरातील ऊसतोड मजूर हे माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीला गेल्या आठ दिवसांपूर्वी गेले आहेत. आज पहाटे ऊस आणण्यासाठी पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बाळू घोशीर, संगीता बाळू घोशीर, प्रमोद बाळू घोशीर, हकीम पठाण, हसीना हकीम पठाण, रावसाहेब शिंदे, छाया रावसाहेब शिंदे टोळीप्रमुख कारभारी शिंदे हे सपाटणे पाटीकडे जात होते. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरकडे जाणा-या टँकर (क्र. एम.एच. 34 एबी. 1377) च्या चालकाचा ताबा सुटल्याने त्याने मार्गावरील बैलगाड्यांना अक्षरश: चिरडले. यामध्ये बाळू घोशीर यांचा जागीच मृत्यू झाला तर हकीम पठाण, हसीना हकीम पठाण, संगीता घोशीर, बाळू घोशीर, साहेबराव शिंदे, छाया शिंदे, कारभारी शिंदे हे जखमी झाले आहेत. जखमींना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये 5 बैलगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी बिभीषण गोशीर यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. टँकरचालक फरार आहे.