Breaking News

बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील दरोडेखोर जेरबंद ;5 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकजण फरार


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेवर दरोडा टाकून रोख रक्कम लुटून नेण्याच्या तयारीत असणारी, पाच दरोडेखोरांची टोळी श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचा़र्‍यांनी मिळून नगर सोलापूर रस्त्यावर मांडवगण शिवारातून जेरबंद केली. एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पकडलेल्या दरोडेखोरांकडून 12 इंच चाकू, मिरची पूड, हेकसा ब्लेड, अडीच फूट लांबीचा लोखंडी पाईप, अडीच फूट लांबीची कटावणी असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो. नि. बाजीराव पोवार यांना गुप्त बातमीदारामार्फत काही लोक मांडवगण शिवारात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पोवार यांनी सहायक पो. नि. निलेश कांबळे, पो. कॉ. प्रकाश वाघ, दादा टाके, उत्तम राऊत, अमोल कोतकर, किरण जाधव, बोराडे, महिला पो कर्मचारी शीतल काळे, अविंदा जाधव, राजश्री चोपडे यांना मांडवगण शिवारात नगर सोलापूर रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असून, सदर ठिकाणी जावून कारवाई करण्याबाबत सूचित केले. त्याचवेळी सहायक पो. नि. निलेश कांबळे यांनी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देवून मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि देशमाने, पो. कॉ. कारखीले, बर्डे, हिंगडे, बनकर हे पथक मांडवगण शिवारात पोहोचले, नगर सोलापूर रस्त्यावर श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असे स्वतंत्र वाहाणातून गस्त घालत असताना रात्री साडेआठच्या सुमारास रघुनाथ घोडके यांच्या शेताजवळ काहीजण दबा धरून बसल्याचे दिसले, प्रथमदर्शनी सहा व्यक्ती त्याठिकाणी दबा धरून बसल्याचे दिसले, पोलिसांना पाहून ते हे इसम पळून जाऊ लागले, पोलिसांनी पाठलाग करत यातील पाच जणांना पकडले, मात्र त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. सदर व्यक्तींकडे चौकशी केली असता, त्यांची नावे रावसाहेब बासर्‍या काळे (रा. कोंभळी ता. कर्जत) बापू राजेकर ऊर्फ काळ्या काळे (रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत), डुपक्या कुंडलिक भोसले (रा. थेरगाव, ता. कर्जत), दुईशेर मिनीनाथ भोसले, (रा. थेरगाव, ता. कर्जत), रोहिदास नेहर्‍या काळे,(रा. घुमरी ता. कर्जत) असे असल्याचे समजले. रोहिदास काळे याने पळून गेलेला इसम त्याचा सावत्र भाऊ नाझ्या नेहर्‍या काळे (रा. घुमरी ता. कर्जत) असे असल्याचे सांगितले. सदर अटकेतील आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेवर दरोडा टाकून, बँकेतील रोख रक्कम लुटून नेण्याचा डाव असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी लूट टळली आहे. सदर घटनेबाबत पो. कॉ. प्रकाश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपींवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.