उद्घाटन होवून देखील बाह्यवळण रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत
दोन ते तीन महिन्यापुर्वी मोठा गाजावाजा करत मत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजुर आहे. या रस्त्यावर ठेकेदाराने खडी व मुरुम टाकले असून, त्याला कामापोटी पन्नास लाख रुपये अदा करण्यात आले आहे. मात्र हे काम अनेक दिवसापासून अर्धवट परिस्थितीत रखडल्याने संपुर्ण परिसर धुळीने माखले आहे. ठेकेदारावर वचक नसल्याने काम रेंगाळले जात असल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. रस्ता खराब असल्याने अवजड वाहतुक शहरातून वळाल्यास अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावरील धुळीने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तसेच धुळीमुळे या परिसरातील शेतीच्या पीकांचे नुकसान होत आहे.पावसाळ्यापुर्वी हे काम न झाल्यास केलेल्या कामावर पुन्हा पाणी फेरले जाणार असून, याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या विषयी कार्यकारी अभियंता एम.एच. कसबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठेकेदाराला काम सुरु करण्यासाठी पत्र दिल्याचे स्पष्ट करुन, अधिक्षक अभियंता यांना भेटण्याचा सल्ला दिला. सदर रस्त्यासाठी मोठा संघर्ष करुन काम मंजुर करुन घेतले आहे, यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. निधी मंजुर असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला ठेकेदाराकडून काम करुन घेता येत नाही. हे काम जाणीवपुर्व रेंगाळले जात असून, यामध्ये ठेकेदार व अधिकार्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप विलास लामखडे यांनी केला आहे. यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य विलास होळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक शिंदे, अजय लामखडे, तुकाराम शेळके, अशोक पवार, मारुती गारुडकर, मुख्तार खान, बाळासाहेब गायकवाड आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.