Breaking News

विहीरीतून बेकायदा पाणी उपसा, तक्रारीकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष


सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा येथिल पाझर तलाव क्र. 4 मधून बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याची तक्रार, वाघुंडे येथिल राजेंद्र मगर यांनी केली. सदरचा तलाव हा लघुपाठबंधारे विभागांतर्गत येत असून याबाबत पारनेरच्या तहसिलदार भारती सागरे यांना दि. 14 मार्च रोजी निवेदन देवून देखिल याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुपा येथिल पाझर तलाव क्र. 4 या तलावासाठी सुपा, वाघूंडे व आपधुप या तिनही गावातील शेतकर्‍यांच्या जमीन संपादित झालेल्या आहेत. सदर पाझर तलाव हा शेतकर्‍यांच्या जमिनीला पाणी मिळावे म्हणून, महाराष्ट्र शासनाने पैसे खर्च करून बांधलेला आहे. तसेच या पाझर तलावाखाली आपधुप व वाघुंडे ग्रामपंचायतीने पैसे खर्च करून विहिरी तयार केलेल्या आहेत. या विहिरीमधून आपधुप व वाघुंडे गावसाठी पाणी पुरवठा केला जात आहे. दोन्ही गावांना पाणी पुरवठ्याबाबत अन्य कोणतीही योजना नाही. त्यामुळे सदर पाझर तलावामध्ये पाणीसाठा कायम राहणे अत्यंत जरुरीचे असतांना तेथिल शेतकर्‍याने पाझर तलावात विहिर खोदून विहिरीमधून बेकायदेशीरपणे एमआयडीसी सुपा येथिल गणराज इसपात प्लॉट नं ए-3 या कंपनीला अडीच इंची पाईपलाईन करून दिली असून, सदर पाईप लाईनमधून नियमित कंपनीकडून पैसे घेवून विकत पाणी दिले जात आहे.
सदरचा पाणीपुरवठा या पुढेही असाच चालू राहिल्यास शेतकर्‍यांना व वाघुंडे व आपधुप गावातले लोकांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही. सुपा औद्योगिक वसाहतीसाठी लाखो रुपये खर्च करून औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पाईपलाईन केलेली आहे, असे असतांना सदर कंपनीला पाणीपुरवठा करण्याचे मुळीच कारण नाही तरी, सदर बाबीची त्वरीत चौकशी करावी असे राजेंद्र मगर यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.