Breaking News

पावसाअभावी शेतकर्‍यांचा जीव टांगणीला


कोपरगाव / ता. प्रतिनिधी
पावसाळा सुरु होवून महिना झाला. काही परिसरात मृग नक्षत्रात शेवटी चांगलेच बरसले.त्या ओलीवर पेरण्या झाल्या, मात्र आता पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजाला मोकळ्या आकाशाकडे बघत पावसाची वाट बघत जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे.
आले साल मागच्या सारखेच हा दरवर्षीचाच परिपाठ झाला आहे. दोन वर्ष दुष्काळाचा सामना केला, मागील वर्षी अनेकांची भेसळ बियाणामुळे फसवणूक झाली. तर पावसाच्या रुसव्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहीले होते. याहीवर्षी पाऊस भरपुर असल्याच्या वल्गना झाल्या. प्रत्यक्षात या वल्गना केवळ बियाणे, खते कंपनीच्या हितासाठी केल्या जात असाव्या असा शेतकर्‍यांचा पुर्वानुमान आहे, सध्या मृग नक्षत्र बरसते तोच शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मका, मूग, बाजरीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने मात्र दडी मारली. सध्या पेरणी केलेल्या बियाणाने जमीनीतुन वर डोके काढले असले तरी, पिकाची तहान भागविण्यासाठी पावसाची नितांत गरज असतानाही ऊन सावल्यांचा खेळ संपत नाही. उगवता सुर्य मोठी अपेक्षा ठेवून उगवतो, मात्र मावळतीचा पदरात निराशा टाकुन जातो. आठ दिवसांत पाऊस न आल्यास पुन्हा होत्याचे नव्हते होवून दुबार पेरणीचे संकट पुढे ठाकण्याची भिती बळीराजाच्या मनात आहे.
मागीलवर्षी कपाशीला बोंडअळीने घेरले, सोयाबीन परतीच्या पावसात झोडपली, सरकारी कागदांवर अधिकार्‍यांनी शाईची रांगोळी काढली, मात्र अजुन पदरात काहीच पडले नाही. अशा अडचणीतुन बळीराजा न खचता शाळकरी मुलांना अनेक उलाढाली करुन शाळेतील पाटी दप्तर घेवून दिले. मात्र आता मोठ्या अपेक्षेने आकाशाकडे डोळे लावुन बसण्याची वेळ आली आहे.