Breaking News

विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन; राईनपाडा हत्याकांडाचा निषेध


श्रीगोंदा / प्रतिनिधी
येथे नॅशनल नोम्याडीक ट्राईबच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली राईनपाडा येथील हत्याकांडात बळी पडलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी व घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंद्याच्या तहसिलदारांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले. राईनपाडा येथे मुलं चोरणारी टोळी समजून सुमारे पाच भटक्या विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या तरुणांचा जमावाकडून झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ श्रीगोंदयाच्या तहसीलदारांना निवेदन देत मोर्चा काढून पुरोगामी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला.
दि.1 जुलै रोजी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या समाजातील भिक्षा मागणार्‍या पाच जणांची जमावाने दगडाने ठेचून अतिशय अमानवीय प्रकारे हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात वावरत असणार्‍या भटक्या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातून भिक्षा मागून उपजीविका करणार्‍या या समाजावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. शिवाय दिवसेंदिवस महाराष्ट्रात अशा घटनांत वाढ होत आहे. यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण या समूहाला मिळत नाही. यासाठी निद्रिस्त शासनाचा या मोर्च्यात आंदोलनकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.
या आंदोलनात भटक्या समूहाला अ‍ॅट्रोसिटी कायद्यात सांमाविष्ठ करावे, हत्याकांडात समाविष्ट असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, राईनपाडा गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यावर भा.दं.वि 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, सोशिअल मीडियावर अफवा पसरवणार्‍यांवर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत, मृत्यूमुखी पडलेल्या पीडित कुटुंबीयांना 20 लाख रुपये तर, नातेवाईकांना सरकारी नोकरी देवून कुटुंबाचे पुनर्वसन करावे, भटक्या विमुक्तांना उपजीविकेचे साधन म्हणून पाच एकर जमीन व राहण्यासाठी हक्काचे घर मिळावे, शिक्षण व निवास्थानासाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, रेणके कमिशन लागू कारावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले.
यावेळी संजय सावंत, रुपचंद सावंत, आप्पासाहेब सोनवणे, शिवाजी पोटे, दीपक घोडके, नितीन सोनवणे, सुनील ओहोळ, गंगाराम मले, बाप्पू माने, रमेश कुसाळकर, विजय गायकवाड, विको शिंदे, जावळे आर डी, नानासाहेब कोथिंबीरे, नारायण सावंतसह शेकडो कारकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.