Breaking News

मृत नव्हे, जीवंत बाळाचे अपहरण झाल्याचा दावा

 अहमदनगर । प्रतिनिधी । 14 -  जिल्हा रुग्णालयातून गायब झालेले अर्भक मृत असल्याचा दावा रुग्णालयाकडून कायम आहे. दुसरीकडे अर्भकाच्या पित्याने ते अर्भक मृत होते, तर त्याचे शवविच्छेदन करण्यापूर्वी आम्हाला का दाखवले नाही? असा सवाल करीत ’माझा मुलगा जीवंत होता. जिल्हा रुग्णालयाने जाणीवपूर्वक त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या नावाखाली त्याचे अपहरण झाले आहे’, असा आरोप केला आहे. 
पोलिसांनी दोन दिवसात या अर्भकाचा तपास न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा पिता गणेश भांडवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.कर्जत तालुक्यातील आखोणी येथील सरिता भांडवलकर यांची 5 तारखेला जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली होती, त्यांना मुलगा झाला होता. दोन दिवसाच्या या अर्भकावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचे दोन दिवसांनी रविवारी पहाटे निधन झाले. ज्यावेळी हे अर्भक मृत पावले, त्यावेळी प्रसूती झालेल्या सरिता यांच्यासोबत त्यांची आई वयोवृद्ध रत्नाबाई ढोबे या उपस्थित होत्या. रुग्णालयातील परिचारीका यांनी संबंधीत अर्भक मृत झाले असल्याचे सरिता आणि रत्नाबाई यांना सांगितले. मात्र, रत्नाबाई या वयोवृद्ध असल्याने त्यांच्या लक्षात काही आले नसल्याचा भांडवलकर कुटुंबाचा 
दावा आहे. वास्तवात अर्भक मृत झाले होते तर रुग्णालय प्रशासनाने आमच्या कुटुंबातील पुरुष मंडळींना येण्याची वाट पाहणे आवश्यक होते. 
रुग्णालयातील पोलिसाने मला फोन केला आणि अर्भक मृत पावल्याचा निरोप दिला. आखोणी येथून नगरला येण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागला. या काळात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गोंधळ घातला असल्याचा आरोप गणेश यांनी केला आहे. मृत अर्भक जीवंत आहे की ते झोपलेले आहे की त्याला भुलीचे इंजेक्शन दिले, हे कळण्यास मार्ग नाही. आमच्या कुटुंबातील एकही पुरूष उपस्थित नसल्याने आमच्या अर्भकाचे अपहरण झाले असल्याचा आरोप गणेश भांडवलकर यांनी केला आहे. दोन दिवसांत त्याचा तपास न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पोटे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गाडे आणि त्वचारोगतज्ज्ञ इंगळे यांची समिती चौकशीसाठी गठीत करण्यात आली होती. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून नाशिक येथील उपसंचालक यांच्या पथकानेही नगरला येवून चौकशी केली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली. त्यांच्या माहितीनुसार अर्भक रविवारी दुपारी 12. 30 ते 2 च्या दरम्यान गायब झालेले आहे. 
संबंधीत अर्भक मृत झाल्यानंतर बाळाजी आजी आणि आया यांनी स्वत: ते अर्भक शवविच्छेदनगृहात नेवून ठेवले. त्या ठिकाणी असणार्या कर्मचार्याकडून मृतदेह मिळाला असल्याची पोहोच घेतली असल्याचे सांगण्यात आले.पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने भांडवलकर यांच्या अर्भकाचा तपास लावावा. सहा दिवसांत तपासात काही प्रगती नाही, कोणाची चौकशी नाही. येत्या दोन दिवसांत तपासात प्रगती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील. जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागाची स्थिती दयनीय झाली आहे. या ठिकाणी जागा नसल्याने प्रसूती विभागात घ प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी असणार्या गर्दीत कोण काय करतो. कोण प्रसूती झालेल्या महिलांचे नातेवाईक आहे, कोण अनोळखी आहे हे समजत नसल्यासारखी स्थिती आहे.