Breaking News

अमृत’च्या परिसरात दाटली वनराई!


संगमनेर प्रतिनिधी - वृक्षरोपण आणि संगोपनाशिवाय सजीव सृष्टीला पर्याय नाही, हा मंत्र देणार्‍या थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची चळवळ देशाला दिली. याचबरोबर त्याच्या प्रेरणेतून नाशिक पुणे महामार्गावर अमृतनगरच्या अमृत उद्योग समुहात लावण्यात आलेल्या विविध वृक्षांच्या हिरवाईमुळे हा परिसर आकर्षक ठरत आहे.

अमृतनगर परिसरात राज्याचे माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सहकारी संस्थांनी स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराबरोबर राज्यात गुणवत्तेने अग्रक्रम राखत हरित वनराई जपली आहे. विविध प्रकारच्या झाडांमुळे हा परिसर सदैव हिरवागार व आकर्षक दिसत आहे. यामध्ये संगमनेर शहराकडून जाताना नगरपालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पाम ट्री उभी केली आहे. ही झाडे आता मोठी झाली असून ती डौलदारपणे उभी आहेत. अमृत उद्योग समूह व विविध शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने दरवर्षी दंडकारण्य अभियानातून बियांचे रोपण व लाखो वृक्षांचे रोपण केले जाते. यामुळे तालुक्यातही वृक्षसंवर्धन संस्कृतीबरोबर हिरवळ वाढली आहे. या अभियानाची दखल सरकारने घेतली असून प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदविला आहे.