Breaking News

शेती महामंडळाच्या वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ; भरदिवसा बिबट्याचे दर्शन


श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंगच्या जवाहरवाडी, लजपत्रवाडी, चिमटा वस्ती व परिसरातील वस्त्यावर बिबट्याने गेल्या सहा महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, काल तर भरदिवसा टिळकनगर- एकलहरे या हमरस्त्यावर अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने पिंजरा लावूनसुद्धा हा बिबट्या जेरबंद होत नसल्याने, सर्वसामान्य नागरिक चांगलेच धास्तावले आहे. राज्य शेती महामंडळाच्या विविध वाड्यांवर गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पिके घेत नसल्याने शेकडो एकर जमिनी ओस खात आहे, या ओस पडलेल्या शेतात बहुतांश राणामध्ये मोठमोठी झाडे झालेली आहेत व इतर शिल्लक क्षेत्र हे सरसगट मोकळे दिसत आहे, या क्षेत्रालगत शेतकर्‍यांचे वस्त्या आहे, या शेतकर्‍यांनी आपली छोटी मोठी पिके लावली आहे, याचा आश्रय या बिबट्याच्या टोळीने घेतला आहे. लगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतात रात्रीचे वास्तव्य करून भरदिवसा वाड्या वस्त्यावरील शेतकर्‍यांच्या जनावरावर डल्ला मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. वाड्यावरील कामगार व वस्त्यावरील शेतकरी शेतात कामानिमित्त गेल्यानंतर हा बिबट्या या वस्त्यावर झडप मारत आहे. रात्री तर टिळकनगर -एकलहरे या हमरस्त्यावर वर्दळ चालू असल्याने रात्रीची प्रवासी वाहतूक जवळपास बंद झालेली दिसून येते त्यामुळे रात्री 10 नंतर कामगार व शेतकरी आप-आपली दारे लावून झोपून घेतात मात्र जनावरे गाय, शेळ्या, मेंढ्या उघड्यावर असल्याने त्यांची चिंता रात्रभर घरात बसून कामगार व शेतकरी करीत आहे. या बिबट्याने इतका धुमाकूळ घातला आहे की, पहाटेनंतर एकमेकाचा आवाज ऐकल्यानंतर दारे उघडली जातात . अधून-मधून हा बिबट्या वाड्या-वस्त्यावर मोठ-मोठ्याने आवाज करत फिरत असतो. नर व मादी असे दोन प्रकारचे हे बिबटे असून या बिबट्याची शेती महामंडळाच्या वाड्या-वस्त्यावर मोठी चर्चा रंगत आहे.
येथील उसाच्या शेतात या बिबट्याने आपला मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या शेतात कामगार जाण्यास तयार नाही . अलीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हे उस पूर्ण पाण्याखाली गेल्याने ओलाव्याचा फायदा घेऊन या बिबट्याने या गारव्यात आपला मुक्काम वाढविला आहे काय अशी चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
शेतकरी हे महामंडळाच्या क्षेत्रालगत राहत असल्याने लगत वस्त्या लांबपल्ल्यावर आहे, तसेच चोवीस तासांपैकी या भागात दिवस रात्र मिळून अवघ्या आठ तास विद्युत पुरवठा चालू असतो ,त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसत आहे. रात्री व दिवसा अंगरक्षक समजल्या जाणार्‍या कुत्र्या सारख्या प्राण्यांवर आता बिबट्याने हल्ला चढविल्याने शेतकरी दुःखी झालेले दिसत आहे. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावला असला तरी वन अधिकार्‍यांनी परिसरात जागेवर येऊन योग्य ह करून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.