जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 30 हजार विद्यार्थी दाखल
। पालकांनी टाकला शाळांवर विश्वास । शिक्षण विभागाच्या दृष्टीने भुषणावह बाब
अहमदनगर (प्रतिनिधी)। 29 - 15 जूनला प्राथमिक शाळा सुरू झाल्यावर पहिल्या 15 दिवसांत शिक्षकांच्या माध्यमातून पटनोंदणी पंधरवडा राबवण्यात येतो. यात पहिलीत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना दाखल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालेल्या शैक्षणिक बदलामुळे पहिलीत 30 हजार विद्यार्थी दाखल झालेले आहेत.गेल्या दोन वर्षात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी रमजान शेख, एस. एम. ढवळे, अभयकुमार वाव्हळ, सोन्याबापू ठोकळ यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याासाठी विविध प्रयत्न केले. ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दृष्टीने भूषणावह ठरणार आहे.
बालकांच्या मोफत शिक्षणाचा कायदा 2011 नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. यानुसार 5 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वय असणार्या प्रत्येक बालकाला सक्तीने जिल्हा परिषदेच्या अथवा पालकांच्या इच्छेनुसार पहिलीच्या वर्गात दाखल करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अलीकडच्या दोन वर्षात झालेले शैक्षणिक बदल, सुधारलेला दर्जा, शिक्षकांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि अधिकार्यांचे सहकार्य, यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांवर मोठया संख्येने विश्वास टाकलेला दिसत आहे.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात पुढील वर्षी पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधीत शिक्षकांकडे तयार असते. यासह अंगणवाडीतील बालके यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करण्यात येते. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झालेले पहावसाय मिळत आहेत. तंत्रस्नेही शिक्षण, प्राथमिक शिक्षण क्षेत्राचे झालेले डिजिटलीकरण यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांवर पुन्हा विश्वास व्यक्त केलेला आहे. यामुळे दरवर्षी पहिलीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांची सरासरी 25 हजार असताना यंदा त्यात 5 हजारांनी वाढ झाली. पहिलीत विद्यार्थी दाखल करण्यात राहुरी तालुका आघाडीवर आहे तर जामखेडमध्ये सर्वांत कमी 712 विद्यार्थी आहेत.
तालुकानिहाय प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या अशी :- अकोले 2074, कर्जत 1505, जामखेड 712, कोपरगाव 1520, नगर 2858, नेवासा 2751, पारनेर 2122, पाथर्डी 2048, राहाता 1547, राहुरी 3757, शेवगाव 2156, संगमनेर 2938, श्रीगोंदा 2858, श्रीरामपूर 1146.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. या कारणाबरोबरच इतर कारणानेही संख्या घटण्यास प्रारंभ झाला होता. शिक्षकांची प्रतिमा वेगवेगळ्या कारणाने मलीन झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व त्यांच्या शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. याचा परिणाम विद्यार्थी प्रवेशावर झाला होता. मात्र, अधिकार्यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना वेगवेगळी मानांकन तसेच डिजीटल शाळाचा दर्जा मिळाला. यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाल्याचे दिसून आले. अनेक परिक्षेच्या निकालामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा बदल पालकांच्या लक्षात आल्यामुळे या शाळांकडे कल वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर स्पर्धा करण्यासाठी जिल्हा परिषदेनेही सेमी इंग्रजीचा पर्याय अवलंबीला आहे. यास सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे.