Breaking News

राजूर ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या


राजुर / प्रतिनिधी 
अकोले तालुक्यातील सर्वात मोठी पेसा ग्रामपंचायत असलेली राजुर ग्रामपंचायतीची कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी अभावी परवड झाली असुन, सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ पातळीवर ढिम्म कारभार सुरू आहे.
राजुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भाऊसाहेब रणशींग यांना तीन महिन्यापूर्वी बडतर्फ करण्यात आले. तेंव्हापासुन ग्रामविकास अधिकारी अभावी ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. जवळपास एक ते दीड कोटीच्या विकासकामांची उद्घाटने झाली. मात्र ग्रामविकास अधिकारी नसल्याने ठेकेदार कामे सुरु करण्यास तयार नाहीत.त्यामुळे निधी अखर्चीत राहाण्याची भिती व्यक्त होत आहे. सत्ताधारी व विरोधक दोघांनीही वारंवार आंदोलने करूनही ढिम्म प्रशासन दाद देत नाही. तात्पुरत्या स्वरूपात दिलेला ग्रामविकास अधिकारी 15 दिवस मेडिकल रजेवर तर कधी अतिरिक्त काम असल्याचे सांगत, राजुर ग्रामपंचायतीकडे फिरकतही नाही. त्यामुळे वसुली मंदावली असुन स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरू असला तरी, एकाच वीजपंपावर तग धरून आहे. दुसरा वीजपंप दुरूस्तीला पाठविला आहे. दुरूस्तीला व वीजबीलाचे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्‍न उभा ठाकला आहे. कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळाल्याशिवाय ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालविणे अवघड बनले आहे. शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. आ. वैभव पिचड यांनीही याप्रश्‍नी जातीने लक्ष घातले मात्र, आचारसंहीतेचे कारण पुढे करत महिनाभर थांबविले. आचारसंहिता संपली तरी राजुरला ग्रामविकास अधिकारी मिळेना. ग्रामविकास अधिकार्‍याची नेमणूक न झाल्यास आंदोलनाचा इशारा राजुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोकुळ कानकाटे व सहकारी सदस्यांनी दिला आहे.


पंचायत समितीला टाळे लावण्याचे आंदोलन मागे घेतल्यानंतर बीडीओंनी आचारसंहिता संपल्यानंतर कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, आचारसंहिता संपून पंधरा दिवस उलटले तरीही वरिष्ठ पातळीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सर्वात मोठी पेसा ग्रामपंचायत निधी असुनही कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी अभावी अडचणीत सापडली आहे.तातडीने ग्रामविकास अधिकारी न मिळाल्यास रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल
- गोकुळ कानकाटे 
उपसरपंच,राजुर


प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका राजुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांना बसत असुन, विकासकामे ठप्प झाली आहेत. स्वच्छता, कामगारांचे पगार, पाणीपुरवठ्याचे वीजबील आदी प्रश्‍न निर्माण झाले आहेत. तातडीने कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी न दिल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
- संतोष बनसोडे 
माजी सरपंच, राजुर