Breaking News

देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या लांब रांगा

जळगाव, दि. 02, सप्टेंबर - शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध धार्मिक, सामाजिक व ज्वलंत विषयांवर आरास व देखावे तयार केले आहेत. हे देखावे  आणि आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे. रस्ते गणेशभक्तांनी फुलले असे चित्र आहे. पावसानेही उघडीप दिल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात  गर्दी होत आहे. रात्री उशीरापर्यंत शहरातील मंडळांसमारे आरास पाहण्यासाठी भक्तांच्या रांगा लागत आहेत.
यावर्षी गणेश मंडळांनी समाजात विविध विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक जनजागृतीवर भर दिला आहे. त्यानुसार  शहरात मंडळांकडून विविध प्रकारच्या आरास व देखावे तयार करण्यात आले आहे. गणेशोत्सवात शेवटच्या दिवसांमध्ये मंडळांकडून तयार करण्यात आलेले देखावे  पाहण्यासाठी जळगावकरांची गर्दी होत आहे.
शहरातील नवीपेठ परिसरात रात्री उशीरापर्यंत शहरातील रस्ते गर्दीने फुलत आहेत. तसेच यंदा शहरातील सार्वजनिक गणेशमंडळांनी विविध विषयांवर आरास व  सजीव देखावे तयार केले असून, देखावे पाहण्यासाठी शहरातील नवीपेठ, रथचौक, सुभाष चौक, नेहरुचौक, बालाजीपेठ या परिसरातील मंडळांना भाविकांची पसंती  मिळत आहे. यावेळी कोल्हापूरची महालक्ष्मी माता मंदिर, शंभूराजे, स्वातंत्र्य संग्राम, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे मठ यासह विविध सामाजिक देखाव्यांची  आरास साकरण्यात आली आहे.