Breaking News

वर्षा माळवदकर यांच्या रांगोळी पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

बुलडाणा, दि. 28 - वर्षा माळवदकर यांच्या नित्योपयोगी रांगोळी डिझाईन कलेक्शन पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उमाताई शिवचंद्रजी तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी जि.प सदस्य श्रीमती सरस्वती वाघ,विनोद वाघ प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
वर्षा माळवदकर स्विय सहाय्यक पदावर काम करत असतांना आपल्या प्रशासकीय कामाचा व्याप सांभाळुन आपल्या अंगी असलेल्या कला गुणांची जोपासना करतात. त्यांच्या कल्पनेतुन  साकारलेले नित्योपयोगी रांगोळी डिझाईन कलेक्शन हे पुस्तक महिलांना नित्य उपयोगी पडणारे आहे.याआधी प्रकाशित झालेल्या त्यांचे दोन काव्य संग्रह वाचनीय असे आहेत.कार्यालयीन काम सांभाळुन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना त्यांनी दिलेला वाव हा कौतुकास्पद असा आहे असे विचार विनोद वाघ यांनी व्यक्त केले.या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उमाताई तायडे म्हणाल्या की   वर्षा माळवदकर यांनी रेखाटलेल्या या पुस्तकातील डिझाईन सुरेख असुन महिलांच्या कल्पना शक्तीला वाव देणा-या आहेत.रांगोळी काढणा-या महिलांना उपयुक्त असे आहे.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना वर्षा माळवदकर म्हणाल्या कि अंगणातील रांगोळीमुळे घराच्या प्रसन्नतेत तर भर पडतेच आणि घरावर येणारे संकट देखिल ही प्रसन्नता न मोडता रांगोळी जवळ थबकते.असा पुर्वापार विश्‍वास आपल्या कडे आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या कक्षात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वर्षा माळवदकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुध्द देशपांडे, साखळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.