Breaking News

विकासाचा वेग रोखणारे मंत्रालयात,मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांच्याकडून विकास कामाचे वाभाडे

नागपूर : मंत्रालयात मंजूर कामासंदर्भात कायमच नकारघंटा वाजवणार्‍यांची कमी नाही, विकासाच्या चालत्या गाडीत खिळे कसे घुसवायचे, याचे एक्सपर्ट महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसले असल्याचे खडे बोल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सुनावले. मुख्यमंत्रील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकास कामाचे वाभाडे काढले. 

मंत्रालयातून शासनाने मंजूर केलेल्या कामासाठी निधी मिळवणं महाकठीण काम असतं. मंत्रालयात बसलेले अनेक अधिकारी प्रत्येक कामात फक्त नकारात्मक सूर लगावतात. त्यामुळे विकासाची चालती गाडी पंक्चर होते, असं गडकरी म्हणाले.नागपुरात नव्या पोलीस भवनाच्या भूमीपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडकरींनी हे खडेबोल सुनावले. 
नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करुन दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही गडकरी यांनी यावेळी केले. नागपूरचा मानबिंदू ठरेल अशी एक इमारत लवकरच नागपुरात आकारास येणार आहे. राज्यात इतरत्र कुठेच नसेल एवढं भव्यदिव्य 6 मजली पोलीस भवन नागपुरात बांधले जाणार असून त्याच पोलीस भवनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन पार पडले. 89 कोटींच्या खर्चाने सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त ही इमारत फक्त नागपूर शहर पोलिसांचेच नव्हे, तर ग्रामीण पोलीस दलाचेही मुख्यालय राहणार आहे.