Breaking News

अंतराळ तंत्रज्ञानात स्वदेशी बनण्याकडे भारताचे प्रयत्न - डॉ. एम.आर.आर. प्रसाद

पालघर, दि. 21 - अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सध्या देशात 85 ते 90 सामुग्री देशामध्ये तयार होत असून याबाबत परिपूर्ण स्वदेशी होण्याचा प्रयत्न भारत करीत  असल्याचे इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एम.आर.आर. प्रसाद यांनी पालघर येथे प्रतिपादन केले.
अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर व पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय अवकाश विज्ञान व  तंत्रज्ञान (इस्त्रो) संस्थेने केलेल्या अवकाशातील प्रगतीची माहिती विद्यार्थी व जनसामान्यांना व्हावी या उद्देशाने विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती देणारे दोन दिवसीय  प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इस्त्रो शास्त्रज्ञ डॉ. एम.आर.आर. प्रसाद, सुरेश मंजूळ, सतीशराव, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष ऍड्. जी.डी. तिवारी ,  प्राचार्य डॉ. किरण सावे, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. इस्त्रोतर्फे राबविण्यात येणा-या अंतरिक्त अभियानाची माहिती व प्रगतीची माहिती देऊन  डॉ. प्रसाद यांनी या योजनेमध्ये देशातील दोनशे उद्योगांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. या क्षेत्रात आपला देश येणा-या काळात परिपूर्ण होईल असा विश्‍वास  त्यांनी व्यक्त केला. अंतराळ विश्‍वात भारत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये असून प्रत्येक वर्षी 20 उपग्रह अवकाशात सोडण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्यामुळे इस्त्रोमध्ये  तरुणांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रदर्शनात उपग्रह, त्यामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी वापरण्यात येणारे अवकाशयान यांची माहिती देण्यात येणार आहे. या  प्रदर्शनात पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, चंद्रायान, मंगलायान, आर्यभट यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आले आहे. तसेच इस्त्रोच्या उपग्रहामुळे टेलिव्हिजन, दूरध्वनी, मरीन  नॅव्हीनेशन, आपत्कालीन व्यवस्थापन, जीपीएस तंत्रज्ञान तसेच नैसर्गिक साधनसामग्रीचे सुनियोजित वापर व व्यवस्थापन, तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्थापनामध्ये  होणा-या वापराची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात याप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून पालघर जिल्ह्यातील विविध भागातून हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी येत आहेत. या प्रदर्शनाच्या  आयोजनाची संधी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल तसेच मंगलयानाने एक हजार दिवसाचा टप्पा गाठल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. जी.डी. तिवारी  यांनी इस्त्रोचे कौतुक व अभिनंदन केले.