Breaking News

धावपटू हिमा दासचा सुवर्ण इतिहास; जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला प्रथमच सुवर्ण


नवी दिल्ली वृत्तसंस्था

भारतीय महिला धावपटू हिमा दासने आज इतिहास रचला. २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली.

हिमाने बुधवारी उपांत्य फेरीत देखील ५२.१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. पहिल्या राऊंडमध्ये देखील तिने ५२.२५ सेकंदाचा विक्रम केला होता. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर सातत्याने तिने आपली वेळ सुधारली. नुकतेच तिने आंतरराज्यीय चॅम्पिअनशीपमध्येदेखील सुवर्णपदक जिंकले होते. या इव्हेंटमध्ये तिने ५१.१३ सेकंदाचा वेळ घेतला होता.वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअनशीपमध्ये यापूर्वी भारतासाठी सीमा पूनिया २००२मधील डिस्कस थ्रोमध्ये कांस्य आणि नवजीतकौर ढिल्लनने २०१४ मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले होते.

स्पर्धा-जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप(U -२०)

धावपटू-हिमा दास (आसाम)

अंतर-४०० मीटर

लागलेला वेळ- ५१.४६ सेकंद

दिग्गजांच्या शुभेच्छा

हिमाच्या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. ट्विटरवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, रितेश देशमुख, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, राज्यवर्धनसिंग राठोड आदी दिग्गजांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.