Breaking News

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांपर्यंत

औरंगाबाद, दि. 02, सप्टेंबर - गेल्या 11 दिवसांपासून जायकवाडी धरणात 18 ते 25 हजार क्युसेकदरम्यान पाण्याची आवक सुरू असल्याने नाथसागरातील  पाणीसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धरण भरण्यासाठी आणखी पाच फूट पाणीपातळी वाढण्याची गरज असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी  दिली. नाशिक, नगर जिल्ह्यांत व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे 20  ऑगस्टपासून नाथसागरात सरासरी 20 ते 30 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात 20 ते 22 ऑगस्टदरम्यान सर्वाधिक 60 हजार क्युसेक पाण्याची  आवक वाढली होती. धरणाच्या पाणीपातळीमध्ये 11 दिवसांत जवळपास साडेपाच फूट वाढ झाली. धरणाच्या साठ्यात 520.67 दशलक्ष घनमीटरने म्हणजेच  जवळपास 18.5 अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडली, असेही शाखा अभियंता चव्हाण यांनी सांगितले. जायकवाडी धरणाची पाणीपातळी 1522 फूट  असून, सध्या पाणीपातळी 1518.07 फूट आहे. धरण काठोकाठ भरायला आणखी साडे चार ते पाच फूट पातळी वाढण्याची गरज आहे. धरणातील उपयुक्त  जलसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोचला.