गांजाची विक्री करणार्या महिलेस अटक
कुळधरण : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील ताजु येथील हनिफा कमल शेख (वय 55 वर्षे) ही महिला किराणा दुकानामधून गांजाची विक्री करताना आढळून आली. कर्जत पोलिसांनी महिलेला ताब्यात घेवुन अटक केली. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक शहादेव पालवे, पोलीस कर्मचारी हृदय घोडके, खैरे, सागर जंगम, साबळे, गाडेकर व महिला पोलीस कर्मचारी कराळे उपस्थित होत्या. पोलीस पथकाने छापा टाकला असता, किराणा दुकानात अडीच किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ताजु गावामध्ये हनीफा व तिचा पती कमल शेख हे गांजाची विक्री करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र अनेक वेळा छापा टाकूनही मुद्देमाल मिळत नव्हता. मात्र शनिवार (दि.14) रोजी गुप्त माहितीदाराकडून फोनव्दारे खात्रीशिर माहिती मिळाली. हनिफा कमल शेख हिच्या दुकानामध्ये छापा टाकला असता, पोलिसांना अडीच किलो गांजा आढळला. या प्रकरणी पोलीसांनी हनिफा शेख हीस अटक केली. पोलिस कर्मचारी सागर जंगम यांनी फिर्याद दाखल केली. कर्जत येथील न्यायालयामध्ये हनिफा शेख हिला सादर केले असता, न्यायाधीश डी.जे. पाटील यांनी 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शहादेव पालवे हे पुढील तपास करीत आहेत.