Breaking News

नगरपालिकेचे पडघम आषाढ मासी सुरू; जानेवारीत होणार थेट नगराध्यक्षाची निवड,


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना पदावरुन हटविण्याच्या हालचालीही सत्ताधारी गोटात सुरु झाल्या आहेत. जानेवारी मध्ये होणार्‍या पालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवड असल्याने ’आषाढा’तील जेवणावळींचे निरोप सुरु झाल्याने आगामी काळात नगराध्यक्ष हटाव सोबतच पालिका निवडणुकीचीही तयारी सुरु झाल्याचे लक्षात येते. 
माजीमंत्री बबन पाचपुते यांच्या ताब्यातील ही पालिका काढण्याची नामी संधी मध्यंतरी विरोधी काँग्रेस आघाडीला चालून आली होती मात्र, सत्ताधार्‍यांची ’मॅनेज’ प्रक्रिया व विरोधी नेत्यांचे कचखाऊ धोरण यामुळे पाचपुते गटच सत्तेत राहिला. गेल्या साडेचार वर्षात छाया गोरे, सुनीता शिंदे यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष पोटे यांचा कार्यकाळ राहिला. आजपर्यंत नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे नगराध्यक्ष झाले आहेत. 
आता पोटे यांच्या जागी येण्यासाठी नाना कोथिंबीरे यांची जय्यत तयारी सुरु आहे. शेवटचे सहा महिने त्यांना देण्याचा शब्द असल्याचा कोथिंबीरे यांचा दावा आहे. पालिकेत पाचपुते गटाला ज्यष्ठनेते बाबासाहेब भोस यांचे पाठबळ आहे. छाया गोरे या भोस गटाच्या तर शिंदे व पोटे हे पाचपुते गटाचे मानले जातात. कोथिंबीरे यांना शेवटी संधी मिळाल्यास भोस गटाची बरोबरी होईल. कोथिंबीरे यांनी मध्यंतरीच बदलासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवले होते. मात्र, पोटे यांनीच त्यांना वेळ मागितल्याची चर्चा होती. आता ती वेळ संपल्याने पुन्हा एकदा भोस गट नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी सरसावला आहे. 
त्यांना पाचपुते गटातील पोटे विरोधकांची फूस असल्याचे बोलले जाते. गटाचे दुसरे नेते सदाशिव पाचपुते यांची कोथिंबीरे यांनी, भेट घेवून पोटे यांना हटविण्याची मागणी नुकतीच केली. पोटे यांनी मध्यंतरी काही काळ मागितला होता. आता तो पुर्ण झाला आहे. बबन पाचपुते हे पंढरीच्या वारीत असून, ते आल्यावर निर्णय घेण्याचा शब्द मिळाल्याचा कोथिंबीरे यांनी सांगितले. 
दरम्यान, विद्यमान नगराध्यक्ष पोटे यांना हटविण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू असतानाच, पुढच्या निवडणूकीची तयारी इच्छुकांनी सुरु केली आहे. पुढचा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण महिला राखीव आरक्षण आहे. त्यात भाजपातील इच्छूक आघाडीवर आहेत. विद्यमान नगराध्यक्ष पोटे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे, डॉ. सुवर्णा होले यांची चर्चा सध्या जोरात आहे. सुनीता खेतमाळीस, बापुराव गोरे व अशोक खेंडके या भाजप पदाधिकार्‍यांच्या नावाचीही चर्चा आहे. यातील शिंदे यांचे पती व नगर-दौंड रस्त्याचे पोट ठेकेदार एम. डी. शिंदे यांनी तर पुढच्या महिन्यात आषाढातील जेवणावळी ठेवली असून, त्याचे आमंत्रण नुसत्या शहरातच नव्हे तर, तालुक्यातील सगळ्या पाचपुते गटाच्या कार्यकर्त्यांना पोहचले आहे. 

डॉ. होले यांनीही शहरात संपर्क वाढवित महिला संघटन, आणि सामाजिक कामातून जोर धरला आहे. त्यांच्याशिवाय शहरातील समस्यांचे पाढे वाचून नागरिकांना जागृत करणारे संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, सतीश बोरुडे यांच्यासह गोरख आळेकर, भाजपाच्या पदाधिकारी जयश्री कोथिंबीरे यांचीही चर्चा नगराध्यक्षपदासाठी सुरु झाली आहे. 

काँग्रेस आघाडी शांत
सत्ताधारी भाजप पुढच्या तयारीला लागले असताना, विरोधक काँग्रेस आघाडी अजून शांत आहे. काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष अर्चना गोरे सध्या तयारीत दिसतात. मात्र त्यांना आ. राहूल जगताप व काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचे अजून थेट शब्द मिळालेला नाही. हे दोघेही भाजापातील वादाची वाट पाहत असतील. त्यामुळे गोरे यांना तयारी सुरु करताना अडचणी आहेत. तरीही त्यांचे पती राजू गोरे यांनी लावलेली ’फिल्डींग’ विरोधकांची अडचण वाढविणारी आहे.