अग्रलेख धक्कातंत्र !
त्यामुळे मोदी यांच्याविषयी जनतेच्या मनात एक नकारात्माक भावना निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील निवडणूका जिंकणे सहज सोपे नाही, याची भाजपला जाणीव आहे.
पुन्हा एकदा सत्तेचा सोपान मार्ग सर करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान 150 खासदारांना तिकीट नाकारले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप पक्ष खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन असून, भाजपच्या गोटातून खासदारांच्या तिकीट वाटपाचे वृत्त समोर आले आहे. वरिष्ठ भाजप नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तिकीट नाकारले जाऊ शकते. प्रकृती अस्वस्थाचे कारण त्यासाठी सांगितले जाते. तन्वी सेठ प्रकरणात स्वराज यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर स्वराज वादाच्या भोवर्यात सापडल्या होत्या. यासोबतच स्मृती ईराणी यांच्याकडून दोन वेळेस चांगली खाती काढून त्यांची दुय्यम खात्यावर बोळवण करण्यात आली. भाजप पक्ष आपल्याच पक्षातील मंत्री व खासदारांवर त्यांच्या कामाच्या पध्दतीवर नाराज आहे. यातच जनतेचा रोष वाढत चालला आहे. यामुळे नवीन चेहर्यांना संधी देण्याची खेळी भाजप खेळण्याच्या विचारात आहे. खासदार उमा भारती यांच्या कामगिरीवर पक्षनेतृत्व नाराज आहे. काही दिवसांपूर्वीच उमा भारती यांच्याकडून खात्याचा पदभार काढून घेण्यात आला होता. तिकीट मिळविण्यासाठी वय हा काही नेत्यांना अडसर ठरू शकतो. त्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, करिया मुंडा, शांता कुमार, बीसी खंडूरी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या नावावर देखील पक्षाकडून विचार केला जाऊ शकतो. सामाजिक अशांतता हा भाजपच्या मार्गांतील मोठा अडसर आहे. तसेच देशातील सामाजिक शांतता सुरळित राहावी, दोन समाजात तेढ माजणार नाही, यासाठी केंद्राकडून काही आश्वासक पावले उचलण्याची गरज होती. मात्र या जातीय दंगलीला पुरक, वक्तव्ये संबधित पक्षांच्या लोकप्रतिनिधीकडून होत होते. त्यामुळे मागे पुरस्कार वापसी सारखी मोहीम देशभरातील साहित्यीक, क लाकार यांनी राबविली होती. त्यांनतर अॅट्रॉसिटी कायद्यातील कलमे, कमकुवत केल्याचा आरोप भाजपावर होत आहे. त्यामुळे येणार्या निवडणूका भाजपसाठी मोठया आव्हानात्मक असेल, यात शंकाच नाही.