शिक्षक बँकेसाठी 557 अर्ज दाखल
अहमदनगर । प्रतिनिधी । 30 - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 28 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (आज) अखेरचा दिवस असून गुरूवार अखेर 21 संचालकांच्या जागेसाठी 557 अर्ज दाखल झाले असून 966 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणूक यंदा घमासान होणार आहे. पहिल्या दिवसापासून मोठया संख्येने इच्छुक उमेदवारी अर्ज विकत नेतांना दिसत आहेत. यामुळे यंदा बँकेत संचालक होण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच मंडळाची युती अथवा आघाडी झालेली नाही.
सर्व मंडळे एकमेकांना वाकुल्या दाखवत असून खर्या अर्थाने 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान माघारी दरम्यान निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. वाढलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
निवडणुकीसाठी सध्या परिस्थितीत पाच ते सहा मंडळ निवडणूक रिंगणात असून निवडणुकीच्या तोंडावर काही मंडळाची निर्मिती झाली आहे.
या मंडळाचे अस्तित्व 29 ला निकाल जाहीर झाल्यानंतर संपणार आहे. जवळपास निवडणुकीसाठी इच्छुक असणार्या सर्व मंडळानी नगर शहरात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपले स्वतंत्र कार्यालय थाटले असून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची ठेप ठेवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्व बडे नेते नगरमध्ये तळ ठोकून आहेत.