Breaking News

पाणी टंचाईसाठी 4.77 कोटीचा आराखडा तयार

सिंधुदुर्गनगरी, दि. 29, मार्च - सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षी 4 कोटी 77 लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात तीन गाव आणि 394 वाड्यांचा समावेश आहे. कामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करा आणि अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍याकडे सादर करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्याने दहा कामांना मंजुरी दिली आहे. नळ योजनेच्या कामासाठी 16 लाख 89 हजार आणि नवीन विंधन विहिरीसाठी 95 लाख 75 हजार असे एकूण सुमारे 1 कोटी 12 लाख 64 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रल्हाद पाताडे यांनी दिली.


जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता हा आराखडा 4 कोटी 77 लाख एवढा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 3 गाव आणि 394 वाड्यामध्ये पाणी टंचाई भासू शकते, असा निष्कर्ष ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला आहे. त्या अनुषंगाने नळपाणी, विंधन विहीरी, विहिरीतला गाळ काढणे आदी कामांची अंदाजपत्रके तात्काळ मागवा व जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना जि.प. अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी करत प्राप्त होणार अंदाजपत्रके अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकार्‍याकडे पाठवा असे आदेश दिले.