Breaking News

... तर मनुस्मृतीला संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करा! विखे पाटील यांची सरकारवर उपरोधिक टीका


ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, या संभाजी भिडे यांच्या विधानाशी सरकार सहमत नसेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी आणि सहमत असेल तर सभागृहात ठराव मांडून मनुस्मृतीला भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करावे, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनूला मोठे ठरविणार्‍या संभाजी भिडेंवर आणि त्याअनुषंगाने सरकारवर सडकून टीका करताना विखे पाटील म्हणाले की, संभाजी भिडे सातत्याने क ायद्याच्या चिंधड्या उडवत आहेत. गेल्या वर्षीच्या वारीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवल्या होत्या. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात त्यांची भूमिका संशयास्पद होती. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. अमूक आंबा खाल्ल्याने मुले होतात, तमूक आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असे सांगून त्यांनी जाहीरपणे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे आणि गर्भनिदान कायद्याचे उल्लंघन केले. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही, असे प्रश्‍न विखे पाटील यांनी उपस्थित केले.