Breaking News

शिरपूर पॅटर्न’च्या नावाखाली बनवाबनवी :राऊत


श्रीरामपूर / ता. प्रतिनिधी 
माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या माध्यमातून तीस वर्षापूर्वी बांधलेले अशोक बंधारे उकरुन माजी आ. ससाणे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढून शिरपूर पॅटर्न’च्या नावाखाली बनवाबनवी केली. खरेतर, हा शिरपूर पॅटर्न नसून माजी आ. ससाणे यांचा त्यांच्या मर्जीतल्या बगलबच्च्यांना फुकटात मुरुम वाहून कमाई करण्याचा ‘ससाणे पॅटर्न’ होता, अशी टिका अशोक कारखान्याचे चेअरमन सोपान राऊत यांनी केली आहे.राऊत पुढे म्हणाले की, करण ससाणे यांनी माजी आ. ससाणे यांनी तालुक्यातील काही ओढे व नाल्यावर शिरपूर पॅटर्न राबविला असे वक्तव्य नुकतेच केले. त्याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत पुढे म्हणाले की, सदरचे वक्तव्य तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणारे आहे. तीस वर्षापूर्वी माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखाना माध्यमातून अशोक बंधारे तालुक्यातील तसेच अशोकच्या कारखाना कार्यक्षेत्रातील 44 गावांमधील ओढ्या-नाल्यांवर जवळपास 350 अशोक बंधारे, अनेक गावतळे, पाझर तलाव असे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कौतुकास्पद ठरलेले जलसंवर्धनाचे मोठे काम केले. माजी केंद्रीय मंत्री स्व. मोहन घारिया, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदिंसह अनेक मान्यवरांनी या प्रकल्पास भेट देवून कौतुक केले. अनेकांनी या प्रकल्पाचे अनुकरणही केले होते. याची आठवण राऊत यांनी करुन दिली.