Breaking News

थापाड्या सरकारला जनता धडा शिकवणार : तुपकर


जामखेड / श. प्रतिनिधी 
आज सर्व सामान्य व शेतकर्‍याची अवस्था अर्धमेल्यासारखी या सरकारने केली आहे. देशाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍याची भाजप सरकारला कदर नाही, तेंव्हा मराठा, धनगर आरक्षण, दीडपट हमी भाव, कर्जमाफी, शिवस्मारक व आंबेडकर स्मारक, पंधरा लाख बाबत थापा मारून फक्त गाजर दाखवण्याचे काम करणार्‍या भाजप सरकारवर आता विश्‍वास नाही. येत्या 16 तारखेपासून दुधाचा थेंबही मुंबईला जावू देणार नाहीत. या काळात रस्त्यावर दिसणार्‍या मंत्र्यांना दुधाचा अभिषेक केला जाईल. येत्या निवडणुकीत थापाड्या भाजपाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे, मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जाहीर सभेत व्यक्त केले. 
दि.14 रोजी जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुध बंद आंदोलनासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार होते. यावेळी प्रा. प्रकाश पोफळे, सुनील लोंढे, प्रल्हाद इंगोले, शहाजी डोके, हनुमान उगले, भीमराव लेंडे, शरद कार्ले, अवधूत पवार, ऋषिकेश डुचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना तुपकर यांनी भाजपावर कडाडून टीका केली. आम्ही केवळ गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाबरोबर युती केली होती. परंतु या थापाड्या सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे. हे सरकार दुधाला अनुदान देत नाही परंतु, उद्योगपतीचा फायदा व्हावा म्हणून दुध बुकटीला अनुदान देत आहे. दुध निर्यात होत नसताना त्यास अनुदान जाहीर केले आहे. ना. राम शिंदे हे दुधउत्पादक शेतकर्‍यांमुळे पालकमंत्री झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दुध भावाची मध्यस्थी करावी. दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतीलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर करावे. अन्यथा पालकमंत्र्यांची भविष्यात आमच्याशी गाठ आहे. दिसेल तिथे दुधाचा अभिषेक केला जाईल. सरकारने पोलीस संरक्षणात दुध नेण्याचा प्रयत्न केला तरी, दुधाचा थेंबही जाऊ देणार नाही. बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर, गाठ आमच्याशी असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, आम्ही तालुक्यातून एक दुधाचा थेंबही जावू देणार नाहीत. शेतकर्‍यांसाठी आपण सदैव कोठेही येण्यास तयार आहे. आंदोलन शंभर टक्के यशस्वी करणार आहेत. शेतकर्‍यांसाठी आपण जेलमध्ये कायपण प्रसंगी मरण पत्करण्यास तयार आहे. 

आंदोलन काळात कोणीही दुध रस्त्यावर ओतून देऊ नका. ते दुध वारकरी, शालेय विद्यार्थी व गोरगरीब लोकांना मोफत द्यावे असे आवाहन तुपकर यांनी केले.