Breaking News

सांगली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

सांगली, दि. 04, फेब्रुवारी - राज्य निवडणूक आयोगाने सांगली महापालिका निवडणुकीसंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. या निवडणुकीचा प्रारूप आराखडा 20 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त सचिव नि. ज. वागळे यांनी दिला आहे. याचदिवशी अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानुसार मे महिनाअखेर अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता व जुलै महिन्यात मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. 



सांगली महापालिकेची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी व सांगली जिल्हा सुधार समिती आदी प्रमुख पक्ष व संघटना रिंगणात असणार आहेत. या सर्वांनीच आपापल्या दृष्टीने मोर्चेबांधणीस सुरूवात केली असली तरी चार सदस्यीय प्रभाग पध्दतीमुळे या सर्वांसमोरच उमेदवारी वाटप, उमेदवार मिळविणे व मतदारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. मात्र प्रमुख राजकीय पक्षांनीही गत तीन महिन्यापासूनच ही तयारी सुरू केली असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. परंतु प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले नसल्याने सर्वत्र शांतता होती.