Breaking News

संत वामनभाऊंच्या दिंडीचे जामखेडला रिंगण उत्साहात


जामखेड / ता. प्रतिनिधी 
श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपुर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहीले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील वामनभाऊ गड येथे शनिवारी दुपारी 3 वा. मोठ्या उत्साहात पार पडले. 
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधीपती ह.भ.प महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.12 जुलै रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
गहिनीनाथगड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, वनवेवाडी, मातकुळी, केकाणवस्ती असा प्रवास करत शनिवारी सकाळी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे दिंडीचे आगमन झाले. जामखेड शहरात प्रवेश करताच, तपनेश्‍वर भजनी मंडळाने सामोरे जावून दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील विठ्ठल मंदिर व जगदाळेवस्ती येथे महाप्रसाद घेवून संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी ही दिंडी पोहचली.
संत वामनभाऊ महाराज मंदिरासमोर प्रांगणात रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल गहिनीनाथ महाराज की जय, सद्गुरु वामनभाऊ महाराज की जय ...असा जय जयकार करत, भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील अश्‍व धावू लागले. या अश्‍वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्यांची पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला. त्यानंतर टाळ मृदूंगाच्या तालावर टाळकर्‍यांनी ठेका धरत खेलीया प्रकरणातील अभांगावर पाऊले खेळत मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी आष्टीचे आ. भीमराव धोंडे, मधुकर राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, विजय महाराज बागडे, दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या भागातून पंढरपूरला जाणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे. चार वर्षापासून दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे. राज्यभरातून सुमारे 25 हजाराहुन आधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.