Breaking News

भंडारदरा मुळा पाणलोटात पावसाचा जोर वाढला


अकोले 
नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा मुळा पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने चांगलाच जोर धरला आहे. मात्र धरणांच्या लाभक्षेत्राकडे पावसाने पाठ फिरविल्याने या भागातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून पावसाची वाट पाहत आहेत.
नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या आदिवासी अकोले तालुक्यात, दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. भंडारदरा धरण आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर पावसाने आदिवासी बांधवांचे जगणे मुश्किल केले आहे. या मुसळधार पावसामुळे भंडारदरा आणि मुळा धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आहे. भंडारदरा धरणाच्या घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी या प्रमुख पाणलोट क्षेत्रात पावसाने दोन अंकी आकडा पार केला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक जोरदार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात नव्याने 419 दलघफू पाण्याची आवक झाली. या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 4271 दलघफूवर जाऊन पोहचला आहे. प्रवरा नदीवर असलेल्या निळवंडे धरणात देखील पाण्याची आवक वाढली असून, धरणाचा पाणीसाठा 971 दलघफूवर जाऊन पोहचला आहे. मुळा नदीच्या उगमस्थानीदेखील पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून, पावसाचे पाणी मुळा धरणात स्थिरावत आहे. कोतुळनजीक मुळा नदी 6592 कुसेक्स वेगाने वाहत आहे. मुळा धरणाने देखील सात टीएमसीचा टप्पा पार केला आहे. शेजारी असलेल्या संगमनेर तालुक्यासह भंडारदरा, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने पुर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाचा जोर धरणांच्या पाणलोट क्षेत्रापर्यंतच टिकून असल्याने, निसर्गाच्या या करामतीचा शेतकर्‍यांना मात्र फटका बसत आहे. भंडारदरा मुळा पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भात लागवडीला मोठा वेग आला आहे. अकोले शहरात पावसाची रिमझिम सुरू असल्याने शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. प्रवरा विभागात पावसाची टीपटीप सुरू आहे. अकोले बसस्थानक परिसर आणि कारखाना रोड परिसरात या पावसामुळे मोठी चिडचिड निर्माण झाली आहे. या ठिकाणी प्रवास करणे नागरिकांना अशक्य होऊन बसले आहे.