Breaking News

शहरातून फेरी काढून आशा सेविकांनी केली जनजागृती


कर्जत / प्रतिनिधी 
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आशा सेविकांनी शहरातून फेरी काढत घोषणा देत जनजागृती केली. 
कर्जत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयापासून आशा सेविकांनी प्रभात फेरी काढली. यानंतर कर्जत येथील श्रद्धा हॅप्पी वर्ल्डमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंख्या नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर हे होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित आशा यांनी जनतेमध्ये लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगण्याचे, आवाहन करताना लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची खूप मोठी जबाबदरी आपल्यावर असल्याचे म्हटले. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी शोभा तापकीर, वैद्यकीय अधिकारी व्हरकटे, आशा समन्वयक मेघा काटे, आशिष बोरा यांनी मार्गदर्शन केले. तर, अध्यक्षीय भाषणात लोकसंख्या नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर यांनी आपल्या हॉस्पिटलच्यावतीने जनतेच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करताना मुलीच्या प्रसूतीनंतर अर्धे पैसे घेण्याचे मान्य केले. आठवड्यातून एक दिवस मोफत सेवा आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत करू असे म्हटले यावेळी डॉ. पाटील, डॉ. एस. बी. शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक अशोक लिंगडे, आरोग्य सेवक बी. टी. पवार, एस. यु. दिसले, स्वप्नील शिंदे आदींसह मोठया संख्येने आशा उपस्थित होत्या.