शिवसेना युवा नेते लक्ष्मण कानडे पुन्हा मनसेच्या वाटेवर?
जामखेड / ता. प्रतिनिधी
राज्यात शिवसेनेचा सत्तेत सहभाग असल्याने सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी, इच्छुकांची गर्दी वाढत असताना मात्र शिवसेनेचे नेते लक्ष्मण कानडे हे पुन्हा घरवापसी करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करून मनसेचा झेंडा खांद्यावर घेणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मनसेमधील काही निष्ठावंतांनी त्यांना पुन्हा पक्षात यावे अशी गळ घातली आहे. शिवसेनेमध्ये असताना ‘जय महाराष्ट्र ’ करणारे कानडे मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. मनसेतील वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लक्ष्मण कानडे यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज जवळा गटात, अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक गावात रस्ते, या माध्यमातून मदत केली आहे. जिल्ह्यात मुलींसाठी पहिली व्यायाम शाळा पाटोदा गावी दोन वर्षांपुर्वी स्थापन करून, त्याचा परिणाम परीसरातील मुली विविध खेळात राज्यात चमकल्या. गटातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी प्रत्येक शाळेला मदत केली. भवरवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत तयार करून दिली. हळगावला पिण्याचे पाणी व टाकी उपलब्ध करून दिली. पाटोदा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली आहे. नान्नज व परिसरात कानडे यांनी छोट्या- मोठ्या रस्त्यांची कामे स्वःखर्चातून केली आहेत. तालुक्यात बर्याच शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांना कपडे, बुट देण्यात आले. ग्रामीण भागात नागरिकांना बोर घेऊन, पिण्यासाठी पाण्याची सोय करून दिली. विद्यार्थ्यांसाठी बस वेळेवर येत नसल्याने, आगार प्रमुख यांना आंदोलनाचा निवेदन देऊन एसटी बस वेळेवर सुरू केल्या आहेत. तसेच नान्नज, जवळा, अरणगाव, भवरवाडी, खामगाव, फक्राबाद, कुसडगाव, रत्नापुर अशा विविध गावांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नाम फाउंडेशनला दुष्काळ निवारण कार्यासाठी तसेच तालुक्यातील अनेक गावांना त्यांनी भरीव मदत केली.
लक्ष्मण कानडे यांनी जि.प. च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेत प्रवेश करून, जवळा गटातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीत होते, मात्र ऐनवेळेस लक्ष्मण कानडे यांचेच नाव मतदार यादीत आले नसल्याने, कानडे यांच्या भावजई पुष्पा मछिंद्र कानडे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांना तीन नंबरचे 5 हजार 910 मते पडली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता ते पुन्हा राजकारणातील ही इनिंग नव्याने सुरु करणार असल्याचे दिसते. त्यानंतर कानडे यांनी शिवसेनेत सक्रिय काम करत होते, मात्र सध्या जामखेड तालुक्यात शिवसेनेचे अस्तित्व दिसत नसल्याने, शिवसेनेतून पुन्हा मनसेत घरवापसी करणार आहेत. त्यांनी मागील महिन्यात मनसेच्या कर्जत येथे झालेल्या बैठकीत जावून, मनसेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची भेट घेतली असून, ते सहकार्यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या मनसे प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित नसली, तरी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर कानडे नाराज असल्याचं समजतंय.
लक्ष्मण कानडे जामखेड तालुक्यात प्रचलित आहेत, तालुक्यातील युवक वर्ग मोठ्या संख्येने कानडे यांच्या संपर्कात आहे, त्यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळू शकते, कानडे यांच्या मनसे प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय चित्र बदलूही शकते.
लक्ष्मण कानडे यांना शिवसेनेत राहण्याची इच्छा नसून, त्यांनी मनसेत जाण्याचा ठामपणे निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कानडे यांनी मनसेतील वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते मनसेमध्ये जावून जामखेड तालुक्यात पक्ष वाढवून, मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले आहे. यांनी 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जवळा गटातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.