Breaking News

निळवंडे धरणाचे पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना लाभ होणार


कोपरगाव : निळवंडे धरणाचे पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे तळे भरण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. तो आता वाचणार असून शेतकऱयांना जादा पाणी मिळणार आहे. आरक्षित पाण्यातून राज्यात कोठेही पाणी देता येते. मात्र पाणीप्रश्नावर जनतेची दिशाभूल करू नये. या प्रश्नावर सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्या, असे आवाहन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. 

स्वच्छ सुंदर कोपरगाव शहराच्या विकासासाठी कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या विचार मंथन बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षतस्थानी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते. यावेळी बिपीन कोल्हे, विधिज्ञ रवी बोरावके, डॉ. अजय गर्जे, कैलास ठोळे आदी उपस्थित होते. संजय सातभाई यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जर कोपगावला निळवंडे धरणाचे पाणी आले तर विकासात्मक दृष्टीने कोपरगाव ५० वर्षे पुढे जाईल. अन्यथा कोपरगाव शहरात पाण्यासाठी महायुद्ध होऊ शकते. कोपरगाव नगरपालिका १० टक्के लोकवर्गणी भरू शकत नाही. त्यामुळे पालिका दारणा धरणातून बंदिस्त पाइपलाईनने पाणी आणू शकली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत सत्यायन मुंदडा, 

व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा, पाणी पुरवठा सभापती स्वप्नील निखाडे, शिवसेना गट नेते योगेश बागुल, पत्रकार रासकर, डॉ. अजय गर्जे, विधिज्ञ अशोक टुपके, बिपिन कोल्हे, विधिज्ञ रवी काका बोरावके, कैलास ठोळे आदींनी भाग घेतला. आ. कोल्हे म्हणाल्या, विकासकामे करण्यासाठी ठराविक शक्ती विरोध करत आहेत. मात्र विरोध होत असला तरीनिळवंडयाच्या पाण्यासाठी अखेरपर्यंत लढायचे आहे. कोपरगाव विकासासाठी आपल्याला मुख्यमंत्रांची साथ आहे. संवादातून प्रश्न मार्गी लावणार आहेत. त्यामुळे गरज पडल्यास आशुतोष काळे यांच्याही बरोबर चर्चा करण्यास आपली तयारी आहे. सूसंचालन नगरसेवक जनार्धन कदम यांनी केले. दिलीप दारुणकर यांनी आभार मानले.