Breaking News

आरोग्य केंद्राच्या इमारत नूतनीकरणास मंजूरी : विखे


लोणी प्रतिनिधी

सोनगाव सात्रळ येथील आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिली. 

या आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विखे यांनीदेखील निधी उपलब्धतेसाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दि. ८ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव दाखल झाला होता. या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीदेखील आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत आणि आरोग्य विभागाचे संजीवकुमार यांची भेट घेतली होती. 

आरोग्य केंद्राच्या इमारत नूतनीकरणाचे काम हे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून करण्यास आरोग्य मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.