Breaking News

संभाव्य दुर्घटनांकडे पालिकेचे दुर्लक्ष


संगमनेर प्रतिनिधी

पावसाळा सुरु झाला असतानाही दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाही. दरवर्षीचा अनुभव असतांनाही संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे विविध उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे.

प्रवरा, म्हाळुंगी व इतर छोट्या नद्यांना दुरवर्षी छोटे मोठे पूर येतात. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. तुंबणाऱ्या गटारींमुळे रस्त्यांवर पाणी साठणे, रस्त्यावरून पाणी वाहने हे प्रकारही दरवर्षी होत असतात. मोडकळीस आलेली घरे, धोकादायक इमारती, रस्त्यावर असणारे खड्डे, जीर्ण वृक्ष असे संभाव्य धोके असतांनाही याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

शहरात जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, या पावसामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. संगमनेर-अकोले तालुक्याती कोसळणाऱ्या पावसामुळे प्रवरा, म्हाळुंगी नदीला पूर येतो. या पुरामुळे नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. याशिवाय म्हानुरी नाटकी या छोट्या नद्यांनाही अधुन-मधुन पुर येतात. नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने म्हानुरी नाटकी या नद्यांचे पात्रच गायब झाले आहे. काही वर्षांपूर्वी नाटकी नदीला रात्री अचानक मोठा पूर आल्यामुळे सुकेवाडी रस्त्यावर असणारी पुनर्वसन कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. हा अनुभव ताजा असतांनाही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. परिसरातील अनेक रस्ते खराब असतात. मात्र हे रस्ते दुरुस्त करण्याऐवजी नगराध्यक्षांच्या प्रभागातील रस्तेच दुरुस्त होताना दिसत आहेत. नगराध्यक्षाच्या घरासमोरील रस्ता चकाचक केला जात आहे. शहरातील अनेक रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.