नवीपेठ भागातील दुकान चोरटयांनी फोडले; २ लाखांचा ऐवज लंपास
राहुरी तालुका प्रतिनिधी
शहरातील नवीपेठेत असलेले बाँम्बे कलेक्शन हे मोबाइलचे दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातील सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. दि. १२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या नवीपेठेत बाँम्बे कलेक्शन हे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानाचे मालक अख्तर कादरी हे दि. १३ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले होते. दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानातील सामानाची उचकाउचक होवून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरटयांनी दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केल्याचे दिसून आले. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात एकजण तोंडाला रुमाल बांधून आत आला व त्याने मुद्देमाल चोरुन नेल्याचे दिसून आले.
एक लँपटाँप, एक एल सी डी टिव्ही, मोबाइल असा एकूण सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. बाँम्बे कलेक्शन हे दुकान फोडण्याची दुसरीवेळ आहे. पहिल्या वेळी झालेल्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी सांगितले, शहरात चोर्या, घरफोड्या, धूमस्टाईल चोरी आणि दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पोलिसांनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. अन्यथा व्यापारी संघटनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रकाश पारख यांनी दिला.