Breaking News

नंदुरबारमध्ये हस्ती बँकेत चोरी; 21 हजारांची रोकड लंपास

नंदुरबार, दि. 01, फेब्रुवारी - नंदुरबार शहरातील गजबजलेल्या भागात असलेली हस्ती बँक चोरट्यांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास फोडली. लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र बँकेतील लॉकरमध्ये असलेली रक्कम लांबविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. यामुळे साधारण सव्वातीन कोटी इतकी रक्कम जाण्यापासून बचावली आहे. चोरट्यांच्या हाती केवळ 21 हजाराची रोकड लागली आहे. चोरटे मात्र हुशार निघाले. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराची यंत्रणा बँकेजवळ असलेल्या विहिरीत फेकली. असे असले तरी चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.


नंदुरबार शहरातील गणपती मंदिर ते हाट दरवाजादरम्यान हस्ती बँकेची शाखा आहे. या शाखेत आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घुसखोरी केली. हस्ती बँकेचा लोखंडी गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. परंतु बँकेतील स्ट्राँग रूममधील लॉकर तोडता न आल्याने बँकेचे मोठे नुकसान होण्यापासून बचावले आहे. 
लॉकरमध्ये जवळपास 3 कोटी रुपयांची रक्कम होती. परंतु, बँकेतील कॅशिअरने वैयक्तिक 21 हजार 300 रूपयांची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आणली होती. ती बँकेत जमा करता न आल्याने ड्रॉवरमध्येच ठेवलेली होती. कॅशिअरची 21 हजार 300 रूपयांची रक्कम घेवून चोरटे पसार झाले. शिवाय, सीसीटीव्हीची हार्ड डिस्क देखील लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्हीची हार्डडिस्क आणि सिस्टीम विहिर चौकातील पुरातन अहिल्यादेवी विहिरीत फेकली आहे. विशेष म्हणजे हस्ती बँकेपासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. बँक फोडल्याची माहिती सकाळी बँकेचा शिपाई घटनास्थळी आल्यानंतर उघडकीस आली. त्याने तात्काळ मॅनेजरला फोन केला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस श्‍वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले . मात्र चोरट्यांचा माग काही अंतरापर्यच निघाला. तर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करुण पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधासाठी जिल्हयाबाहेर रवाना झाले आहे.