Breaking News

तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर


कर्जत / प्रतिनिधी
नियमितपणे वीजबिल भरणारे ग्राहक अंधारात तर, आकडे टाकुन अनधिकृतपणे वीजवापर करणारे मात्र उजेडात असा काहीसा अजब प्रकार, कर्जत तालुक्यात पहावयास मिळत आहे. याबाबत वीजचोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कर्जत तालुक्यात आजमितीस विद्यूत रोहित्र जळण्याच्या समस्येने महावितरणचे ग्राहक विशेषत: शेतकरी त्रस्त आहेत.एकीकडे या परिसरातील ग्राहक नियमित विज बीले भरत आहेत. तर दुसरीकडे विद्यूत पोलवरून आकडे टाकून घेणार्‍यांची संख्या कमी नाही. कृषी पंप पाणी तापवण्यासाठी वापरण्यात येत असलेले हिटर आदीच्या अधिकच्या वीज वापरामुळे कृषीपंप तसेच घरगुती वीजवापर करणारे रोहित्र सतत जळत आहेत. कर्जत परिसरात व अनेक गावात अचानक कमी दाबाने होणार्‍या वीज पुरवठयाने टि.व्ही, फ्रीज, पंखे व बल्ब आदी जळण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. या परिसरातील अनाधिकृतपणे वीज वापर करणार्‍यांवर महावितरणने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

अनेक गावातील रोहीत्र जळालेल्या अवस्थेत आहेत. अनेक वाडया-वस्त्या पाच-पाच दिवस अंधारात आहेत. ते रोहीत्र तातडीने दुरूस्त अथवा बदलुन देणे आवश्यक असतानाही महावितरणचे अधिकारी चिरी-मिरीसाठी सर्वसामान्य शेतकर्‍यांची अडवणूक करतात. महावितरणकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे तसेच गरजेचे आहे.

वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी लाईटचे पोल वाकले असुन, तारा सैल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके जळण्याच्या घटना घडल्या आहेत. सैल तारा आवळुन देण्याची मागणी करूनही महावितरणचे कर्मचारी व अधिकारी चिरीमिरीसाठी दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकर्‍यांंना रोहीत्र व वाकलेले पोल व सैल तारांच्या दुरूस्तीसाठी शेतकर्‍यांना वर्गणी गोळा करून, ती वर्गणी महावितरणकडे देवून आपले काम करावे लागत आहे. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत हे मात्र विशेष...