Breaking News

कैद्यांनी समजावून घेतला पसायदानाचा सार


अहमदनगर / प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी सोमवारी भक्तीमय वातावरणात पसायदानाचा सार समजावून घेतला. 
कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या पुढाकाराने तसेच समर्थ शांतीदूत परीवार पुणे यांच्या प्रेरणा कार्यक्रमांतर्गत डॉ. संदीप बाहेती यांचा पसायदानावर आधारीत आकाश भरारी कार्यक्रम झाला. डॉ. संदीप बाहेती यांनी रसाळवाणीने पसायदानावर आधारीत प्रवचनात कैद्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सुपरीटेंडेंट एन जी सावंत, सिनीअर जेलर शामकांत शेडगे, डॉ. खंडागळे, फार्मासिस्ट क्रांती सोनमाळी, लिपीक वसंत सपकाळ आदी उपस्थित होते. 
डॉ. बाहेती म्हणाले की, आता या सकारात्मक शब्दांपासून सुरू होणारी, तसेच प्रार्थनेतून प्रगतीकडे आणि निरपेक्ष प्रेमाचा संदेश देणारे पसायदान सर्वोत्कृष्ट प्रार्थना ठरली आहे. ज्ञानेश्‍वरीच्या अध्ययनातून वाईट प्रवृत्तींना दूर करता येते. पुढे ते म्हणाले की, मातेने आपल्या लेकरास ज्ञानेश्‍वरी, गाथा व दासबोध समजावून सांगितल्यास आतंकवादी, नक्षलवादी तसेच गुन्हेगार तयार होणार नाहीत. तसेच एकमेकांतील संवादामध्ये सकारात्मक शब्दांचा वापर करून यज्ञरूपाने झाल्यास नात्यातील प्रेममय संबंध दृढ होण्यास मदत होते. हे आपण ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या साहित्यातून शिकतो असेही ते म्हणाले.