Breaking News

राशिनला युक्रांदचा युवा परिसंवाद मेळावा


कुळधरण / प्रतिनिधी 
युवक क्रांती दलाच्या वतीने कर्जत तालुक्यातील राशिन येथे युवा परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि. 12)रोजी सकाळी 10 वा. श्री जगदंबा भक्त निवास येथे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी तसेच अहमदनगर येथील रेहमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर हे युवकांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती युक्रांदचे सहकार्यवाह आप्पा अनारसे यांनी दिली.
युवक क्रांती दलाच्यावतीने विविध ठिकाणी व्याख्याने, युवा मार्गदर्शन शिबिरे तसेच चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. राज्याच्या विविध भागात युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात योगदान दिले आहे.डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या प्रेरणेने युवकांची एक फळी कर्जत तालुक्यात सक्रियतेने कार्यरत आहे. युक्रांदच्या कर्मभूमीत राशिन येथे स्वभान ते समाजभान यावर युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. राशिन तसेच कर्जत तालुक्यात भेडसावणार्‍या विविध प्रकारच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच वैयक्तीक प्रश्‍नांवर यावेळी चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. युक्रांदच्या राशिन केंद्राच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, युक्रांदच्या राशिन केंद्राचे प्रमुख किरण पोटफोडे तसेच, सागर जाधव, वसीम शेख, परशुराम जंजिरे, निलेश काळे आदींनी केले आहे.