Breaking News

कर अधिकार्‍याच्या घरावर छापा, कोट्यावधींच्या 7000 साड्या जप्त

बंगळुरु, दि. 01 - लाचलुचपत विभागाने व्यावसायिक कर विभागाच्या उपायुक्तांच्या घरी टाकलेल्या छाप्यात कोट्यावधी रुपये किंमतीच्या साड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कर्नाटकच्या हुबळीतील ही घटना आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी कपाट उघडताच त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्‍वास बसला नाही. त्यांना साड्या मोजण्यासाठी तब्बल 6 तास लागले. कोट्यावधी रुपये किंमतीच्या आणि प्रत्येक प्रकारची डिझाईन असलेल्या 7 हजार साड्या जप्त करण्यात आल्या.
उपायुक्त करियप्पा एन. यांच्या पत्नीच्या या साड्या असल्याची माहिती आहे. उपायुक्तांच्या पत्नीकडेही साड्यांबाबत चौकशी केली. पण आपला साड्यांचा व्यवसाय असल्याचा दावा करण्यात आला, मात्र योग्य पुरावा देता न आल्याने तो दावा फोल ठरला. साड्यांव्यतिरिक्त उपायुक्तांकडे 3 घरं, बंगळुरुत एक फ्लॅट, प्लॉट, शेती, सोनं आणि महागड्या वस्तूही लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांना आढळून आल्या.