Breaking News

कृषी विभागामुळे शेतकर्‍याची जमीन झाली उजाड ! धामणगावच्या शेतकर्‍याचा आमरण उपोषणाचा इशारा


अकोले / प्रतिनिधी 
दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेतील शेततळे फुटून फळबागा उजाड झालेल्या, अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील शेतकर्‍याने प्रशासनाला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
धामणगाव आवारी येथील कळमदरा शिवारात राहणार्‍या सुभाष भाऊराव आवारी यांच्या स्वमालकीच्या शेतातील फळशेती जागेवर उजाड झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात आलेले जलयुक्त शिवार योजनेतील चारही तलाव दोन वर्षांपूर्वी फुटले होते. या तलावांच्या पाण्यामुळे सुभाष आवारी यांच्या शेताची पूर्णपणे नुकसान झाले. सुभाष आवारी यांच्या दोन एकरात डाळिंब, पेरू, निमोनी, चिक्कू, टोमॅटो हे फळपिके ऐन जोमात होती. परंतु कृषी विभागाने केलेल्या बंधार्‍यांच्या निकृष्ट कामाचा फटका त्यांना बसला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात बांधण्यात आलेले चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून गेले. परंतु बंधार्‍यात पाणी पूर्ण क्षमतेने साचल्यानंतर पाणी बाहेर काढण्यासाठी कृषी विभागाने सांडवाच काढला नाही. त्यामुळे बंधार्‍यात नव्याने येणार्‍या पाण्याची आवक वाढत राहिली. नवीन आलेले पाणी बाहेर न पडता बंधार्‍यात साचत गेल्याने अखेर उंचावर असलेला पहिला बंधारा फुटला. या बंधार्‍याचे पाणी दुसर्‍या बंधार्‍यात गेल्यामुळे तो बंधारादेखील फुटला. अशा प्रकारे क्रमाक्रमाने चारही बंधारे फुटल्याने शेतकर्‍याच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या चारही बंधार्‍यांच्या पाण्यामुळे या परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरी गाडून गेल्या, बांध फुटले, शेतातील मालासाहित जमीन वाहून गेली, अनेक शेतकरी बेघर झाले. कृषी विभागाच्या एका चुकीमुळे काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन बसले. या घटनेची अकोले तालुक्यात सर्वत्र चर्चा झाली. महसूल आणि कृषी विभागाने घटनास्थळी येवून पंचनामा केला. लोकप्रतिनिधी देखील प्रत्यक्ष ठिकाणी येवून भेट देवून गेले. सर्वांनी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वाहनही दिले. मात्र या घटनेला आज तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. संबंधित शेतकर्‍यांना एक रूपयांचीही शासकीय मदत मिळाली नाही. पीडित शेतकरी शासन दरबारी हेलपाटे मारून थकले. त्यामुळे शासनाला जाब विचारण्यासाठी सुभाष आवारी या शेतकर्‍याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या शेतकर्‍याची गाडलेली विहीर अजून तशीच आहे, विहिरीत गाडली गेलेली मोटार देखील, त्यांनीवर काढण्याचा प्रयत्न केला नाही. शासनाने एकदा आमची व्यथा याची देही याची डोळा पाहुनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा सुभाष आवारी यांनी दिला आहे.