Breaking News

आषाढी यात्रेसाठी नागरिकांना थेट गावातून बस


सुपा / प्रतिनिधी 
आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीने वारकर्‍यांसाठी जादा बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. गावातील नागरिकांनी बसची मागणी केल्यास, त्यांना थेट गावात बस दिली जाणार असल्याची माहिती पारनेर आगार व्यवस्थापक पराग भोपळे यांनी दिली. 
यासाठी नगर विभागाने जिल्ह्यातील आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या असून त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना पत्र पाठवले जात आहेत.
आषाढी यात्रेसाठी नगर विभागाने साडेतीनशे जादा बसचे नियोजन केले आहे. या जादा बस जिल्ह्यातील आगारातून 20 जुलैपासून सोडल्या जाणार आहेत. तसेच नगर शहरासाठी तारकपूर बसस्थानक व सोलापूर रोडवरील चांदणी चौक येथून बस सोडल्या जाणार आहेत. यासाठी कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गावातील नागरिकांनी मागणी केल्यास त्यांनाही जादा बस दिली जाणार आहे. यासाठी 45 ते 50 प्रवाशांची अट आहे. एवढे प्रवासी असल्यास बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती तालुका स्तरावरील आगार व्यवस्थापकांना दिली आहे. आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या पातळीवर ग्रामपंचायतींना पत्र देऊन याबाबत माहिती द्यायची आहे. या निर्णयामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांनाही थेट गावातून एसटी बस मिळणार आहे. आगार पातळीवर त्यानुसार कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना पत्र पाठवले जात असून ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर याबाबत माहिती देण्यास सांगितले जात आहे. एसटीच्या या आवाहनास ग्रामपंचायती कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जादा बसची संख्या -
तारकपूर : 40, शेवगाव : 18, जामखेड : 25, श्रीरामपूर : 15, कोपरगाव : 15, पारनेर : 25, संगमनेर : 20, श्रीगोंदा : 35, नेवासा : 21, पाथर्डी : 20, अकोले : 10 या एकूण 244 व्यतिरिक्त धुळे विभागाच्या 100 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.