Breaking News

वाळवणे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील वाळवणे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. प्रशात निघवेकर यांच्या हस्ते सरपंच उत्तम पठारे यांनी हे मानांकन स्वीकारले. यावेळी माजी सरपंच कल्पना थोरात, उपसरपंच सदाशिव पठारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ दरेकर, प्रगतशिल शेतकरी विनायक लगड, माजी उपसरपंच संतोष थोरात, ग्रामविकास अधिकारी सुनिल दुधाडे आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच उत्तम पठारे म्हणाले की, गटविकास अधिकारी विशाल तनपूरे, विस्तार अधिकारी रविंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती सभापती राहूल झावरे, उपसभापती दिपक पवार, जि. प. सदस्या राणी लंके यांच्या सहकार्याने गावात विविध विकास कामे केली. तालुक्यातील सर्वप्रथम जलशुद्धीकरण प्रणाली राबवली, गाव अंतर्गत गटार योजना, रस्ता काँक्रिटीकरण आदींसह शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत यशस्वी रित्या पोहोचवली. गावात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली असल्याने अल्पशा पावसातदेखील गाव पाणीदार झाले असून, पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. ग्रामस्थांच्या व परिसरातील सुमारे 7 गावच्या दळवळणाचा व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या वाळवणे गावालगत असलेल्या पुलाचा प्रश्‍न मार्गी लावला असून, त्या पुलाचे लोकार्पण नुकतेच आ. विजय औटी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गावातील सुसज्य परिसर व इतर बाबी पाहून शासनाच्या वतीने ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ दरेकर यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत सदस्य संतोष पठारे यांनी मानले.