Breaking News

सेंद्रिय शेती करून शेतकर्‍यांनी समृद्ध व्हावे : बर्‍हाटे



सुपा / प्रतिनिधी 
रासायनिक द्रव्यांच्या शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. मानवाला निरोगी जीवन जगन्यासाठी व अर्थसमृद्धीसाठी शेतकर्‍यानी सेंद्रिय शेती करावी, असा सल्ला आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी तालुक्यातील वाडेगव्हाण येथील प्रगतशील युवा शेतकरी दिपक खंदारे यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी करताना दिला.
यावेळी बर्‍हाटे व दरेकर यांनी खंदारे यांची शेडनेट शेतीस व परिसरातील शेतकर्‍यांची पेरू, कलिंगड, डाळींब, शिमला मिर्ची या पिकांसह शेत तलावाची पाहणी केली.
आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे अधिक माहिती देताना म्हणाले की, शासन सेंद्रिय शेतीसाठी खूप प्रोत्साहन देत असून शेतकर्‍यांनी ते स्वीकारावे. जमिनीची पोषकता वाढविण्यासाठी व तिचे आरोग्य सांभाळण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणे टाळावे. शेतकरी समृद्ध तर, देश समृद्ध होईल. त्यासाठी आता प्रत्येक गावातून शेतकर्‍यांनी पुढे येवून, आपली मानसिकता सेंद्रिय शेतीकडे पुरस्कृत करावी. यावेळी तालुका कृषि अधिकारी रामदास दरेकर, तालुका व्यवस्थापक देवेंद्र जाधव, उमेश डोईफोडे, बापू होले, सोमनाथ चौधरी, संदीप इंगळे, राहुल शेळके, दिपक खंदारे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.