Breaking News

वारसा स्थळ जतन कार्य करणाऱ्या नागरिक संघटनांना श्रेय - मुख्यमंत्री

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचा समावेश होणे ही मुंबई व महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळण्याचे श्रेय शासकीय यंत्रणा आणि दक्षिण मुंबई भागातील जतन कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या पथकाने युनेस्को परिषदेत आपली भूमिका ठामपणे मांडली. केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असा निर्णय युनेस्कोने घेतला, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासकालीन वास्तूंच्या जतनासाठी अग्रेसर असणाऱ्या नागरिकांच्या संघटनांनी केलेल्या जतन कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे आज, दि. 30 जून रोजी झालेल्या 42 व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्याची घोषणा आज करण्यात आली. याबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. युनोस्कोच्या या घोषणेनंतर राज्यात पाचवे जागतिक वारसा स्थळ म्हणून दक्षिण मुंबईतील परिसराचा समावेश झाला आहे. देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.