Breaking News

अधिवेशनासाठी नागपूरला जाणारी पोलीस व्हॅन उलटली, चालक जखमी

येत्या 4 जुलै पासून नागपुरात सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी जाणा-या राज्य राखीव दलाचिस व्हॅनला आज, शनिवारी तिवसा नजीक अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालक जखमी झाला आहे. यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार नागपुरात पहिल्यांदाच होऊ घातलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी अमरावती येथुन एम.एच. 27 बी.एक्स 0368 या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने गट क्र.-7 ची राज्य राखीव दलाची 7 कर्मचा-यांची एक तुकडी जात होती. दरम्यान तिवसा नजीक अचानकपणे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटली. या अपघातानंतर काही अंतरावर वाहन चक्क घासत गेले यात चालक एस.एस.चव्हाण हे जखमी झाले असून त्यांचा हात फ्रक्चर झाला असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जवानांना या अपघातात किरकोळ इजा झाली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी राज्य राखीव दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.